हनुमान मंडळाचा एकोपा समाजाला आदर्शवत : अमोल ठाकूर
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी सभासदांचा सत्कार
कराड – लोकमान्य टिळकांनी कायदेशीर बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे सांगितले होते. हनुमान गणेश मंडळाने नव्या- जुन्याचा मेळ घालत एकोपा जपला आहे, तो एकोपा समाजाला आदर्शवत असा आहे. समाजात कायदा, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तरूण पिढीची आहे. तरूणांना सामाजिक जबाबदारीचे भान असल्यास समाजाला सकारात्मक दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी केले.
तांबवे (ता. कराड) येथील हनुमान गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी सभासदांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक सदस्य जालिंदर पाटील होते. यावेळी कोटा अॅकडमीचे संचालक महेश खुस्पे, मंजिरी खुस्पे, लेखक अभयकुमार देशमुख, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पाटण अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष धनंजय ताटे आदी उपस्थित होते.
महेश खुस्पे म्हणाले, ग्रामीण भागात आजही एकत्रितपणे येवून सामाजिक उपक्रम राबवतात हे काैतुकास्पद आहे. हनुमान गणेश मंडळाला 50 वर्ष पूर्ण होणे आणि जुन्या सभासदांचा सत्कार ही कल्पना अत्यंत आदर्श घेण्यासारखी आहे.
अभयकुमार देशमुख म्हणाले, माणसाला आनंद प्रत्येक गोष्टीत मिळतो, तो शोधता आला आहे. टाळ- मृदगांच्या गजरात हनुमान मंडळ अवघ्या दीड हजार रूपयात विसर्जन मिरवणूक काढते. तरूणांना जुन्या- जाणत्या लोकांची साथ ही चांगली बाब आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, महेश खुस्पे, मंजिरी खुस्पे आणि प्रकाश पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. माजी सभासदांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सुरज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन सतिश यादव यांनी केले. प्रास्ताविक डाॅ. शंभूराज पाटील यांनी केले. आभार विशाल पाटील यांनी मानले.
तांबवे – हनुमान गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी सभासदांच्या सन्मान कार्यक्रमात बोलताना डीवायएसपी अमोल ठाकूर. यावेळी महेश खुस्पे, मंजिरी खुस्पे, अभयकुमार देशमुख आदी.