भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत डाॅल्बी व लेजरला बंदी – रमेश गर्जे
वाई : भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव काळात गणेश मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजाच्या डाॅल्बीसह लेजर किरण लाइटला पुर्ण बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी आज झालेल्या बैठकीत दिली आहे.
भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक पोलिस ठाण्याच्या कार्यालयात घेण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शनपर सूचना करताना श्री रमेश गर्जे बोलत होते.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भडांरे, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र जाधव, हद्दीतील विविध गावचे पोलिस पाटील व सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.श्री रमेश गर्जे म्हणाले , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या आदर्श नियमावलीची अमंलबजावणी करावी त्यात परवान्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावेत, धर्मादाय आयुक्त यांचेकडे मंडळाची नोंद करावी, पोलीसांनी ठरवुन दिलेल्या वेळेतच गणेशविसर्जन मिरवणुक काढावी. गणेशोत्सवा करिता कोणाही व्यक्तीवर वर्गणीसाठी दबाव आणुन सक्तीने वर्गणी गोळा करु नये, उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य व सलोखा वाढीस लागेल अथवा देशभक्तिपर देखावे उभे करावेत. ध्वनीक्षेपकामुळे ध्वनी प्रदुषण होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. मिरवणुकीच्या वेळी इतर धर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ज्यादा वेळ मिरवणुक रेंगाळत ठेऊन गुलालाची उधळण करु नये. मिरवणुकीत जातीय सलोखा भंग होईल अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा देऊ नये. मिरवणुकीत मदयपान करुन बिभत्स हातवारे, नृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेळी मुली महिलांची छेडछाड होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. ठरवुन दिलेल्या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा मानांकनातच वापर करावा. गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेळी लागु असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे तसेच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या सुचना तसेच आदेशाचे तंतोतंत पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. गणेशोत्सव कालावधीत कोणत्याही प्रकारे अफवा पसरविल्या जाणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्यात यावी . सार्वजनिक मंडळांनी सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.