उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई व वाई जिमखाना वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाई फेस्टिवल 2024 चा शानदार प्रारंभ
वाई प्रतिनिधी –उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई व वाई जिमखाना वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाई फेस्टिवल 2024 ची सुरवात रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी महागणपती घाटावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेने संपन्न झाली. एकूण 6 गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत वाई मधील 850 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, यावर्षी पहिल्यांदाच वाई फेस्टिवल अंतर्गत वाई तालुक्यातील इतर शाळांमध्ये देखील ही स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये 2100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जवळपास 3000 स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन विक्रमी इतिहास नोंदवला व वाई फेस्टिवल वाई तालुक्यात देखील प्रत्येक घराघरात पोचला. या स्पर्धेचे उद्घाटन वाईतील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर (बापू) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. फेस्टिवल चे संकल्पक कै आनंद कोल्हापुरे यांनी 16 वर्षापूर्वी वाईतील कलाकारांसाठी सुरू केलेला हा सोहळा अविरत सुरू ठेवला याबद्दल त्यांनी सर्व संचालक मंडळाचे विशेष कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्याच हस्ते वाई फेस्टिवल च्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेसाठी कायम मार्गदर्शन करणारे वाईतील ज्येष्ठ चित्रकार श्री श्रीमंत होनराव व कलाशिक्षक श्री बाळासाहेब कोलार यावेळी उपस्थित होते. यावर्षी या स्पर्धेत कातकरी समाजातील मुलांनी देखील हजेरी लावली व आपल्या कल्पक बुद्धीतून अप्रतिम चित्रे रेखाटली. वाई फेस्टिवल हे सर्व व्यापक असून , प्रत्येकाला हा उत्सव आपलासा वाटावा याची ही पोहोच पावती ठरली.
चित्रकला स्पर्धेस वाई व वाई तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल फेस्टिवल चे अध्यक्ष श्री शरद चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी फेस्टिवल चे सचिव श्री सुनील शिंदे, निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे, उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, फेस्टिवल चे समिती सदस्य डॉ मंगला अहिवळे, श्री नितीन वाघचौडे, श्री वैभव फुले, श्री श्रीकांत शिंदे, श्री संजय वाईकर, श्री भूषण तारू, सौ प्रीती कोल्हापुरे, श्रीमती नीला कुलकर्णी, श्री प्रणव गुजर, श्री परवेज लाड,उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.