गोवा सरकार ऑक्टोबर २०२५ मध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट आयोजित करणार
पणजी, २६ जून २०२५ गोवा सरकारकडून दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ चे औपचारिक उद्घोष करण्यात आले असून, हा विशेष महोत्सव येत्या ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. यंदाची थीम आहे “युनिव्हर्सल डिझाइन आणि समावेशक विचार”, जी सर्वसमावेशक आणि सुलभ समाजाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पर्पल फेस्ट हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर मानसिकता बदलण्याची चळवळ आहे. गोवा असा समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे समावेश ही एक विशेष बाब नसून एक नैसर्गिक जीवनशैली असेल. हा महोत्सव केवळ गोव्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सकारात्मक संदेश पोहोचवेल.
या महोत्सवात पूर्वसंध्येपासून अधिवेशने आणि कार्यशाळा सुरू होतील. पुढील चार दिवसांमध्ये अनेक सांस्कृतिक, सामाजिक व अनुभवात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी सादर केलेली कार्यशाळा, सामाजिक संस्थांचे प्रदर्शने आणि सामान्य नागरिकांसाठी अनुभवात्मक झोनसुद्धा असतील, जेथे दिव्यांगांचे जीवन अनुभवता येईल.
यावर्षी प्रथमच, दिव्यांग व्यक्तींसाठी पॅरासेलिंग, जेट स्कीइंग आणि स्कुबा डायव्हिंग यांसारख्या समावेशक जलक्रीडा उपक्रमांची सुविधा देण्यात येणार आहे. ही एक धाडसी पण प्रेरणादायी पायरी असून सहभागींसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
भारतासह जगभरातील दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विचारवंत यामध्ये सहभागी होणार असून, हा महोत्सव सशक्तीकरण, जाणिवा आणि दीर्घकालीन सामाजिक बदल यासाठी एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे.गोवा सरकार सर्व नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवात सहभागी होण्याचे मनापासून आमंत्रण देते.
