समलिंगी व्यक्तींनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार – मा. किशोर बेडकीहाळ
सातारा येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शुभांगी दळवी लिखित द लेस्बिअन या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी दि. ६ रोजी ज्येष्ठ विचारवंत मा. किशोर बेडकीहाळ यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे, अॕड. सुचित्रा घोगरे-काटकर, डॉ. संदीप श्रोत्री, विनोद कुलकर्णी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जिथे सामान्य महिलांनाही स्वतःच्या लैंगिक भावनांना व्यक्त करणे सहज शक्य नसते अशा समाजात समलिंगी महिलांचे अस्तित्व मान्य करणे ही खूप मोठी सामाजिक क्रांती होईल. परंतू सध्या तरी हे सहजासहजी घडणे अशक्य आहे. या कादंबरीच्या निमित्ताने हा स्वीकार करण्यात समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मदत होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी समलिंगी महिलांच्या अनुषंगाने त्यांची जडणघडण, कारणे आणि परीणाम, सामाजिक कौटुंबिक स्थान, कायदा, शारीरिक व मानसिक अवस्था आणि यासंबंधी द लेस्बिअन या कादंबरीत आलेले मुद्दे अशा अनेक मुद्द्यावर आपले विचार मांडले. जन्मतःच असणाऱ्या समलिंगी भावना आणि वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवातून निर्माण होणारे समलिंगी संबंध या पार्श्वभूमीवर दुसऱ्या प्रकारातून निर्माण होणाऱ्या महिला समलिंगी संबंधांचा लेखाजोखा शुभांगी दळवी यांनी या कादंबरीत शब्दबद्ध केला आहे.
सविता कारंजकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सातारा आणि परिसरातील लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
