उद्योजक अंकुश मोरे यांनी मांघर केंद्रातील २४० विद्यार्थ्यांना ट्रॅकसूटचे वाटप केले!
महाबळेश्वर, १८ मे २०२४: उद्योजक अंकुश कोंडीबा मोरे यांनी आज मांघर केंद्रातील चौदा शाळांतील २४० विद्यार्थ्यांना ट्रॅकसूटचे वाटप केले. वसई येथे वास्तव्यास असलेले मोरेंचा मूळगाव येरणे, महाबळेश्वर तालुक्यात आहे. लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या निमित्ती त्यांनी ही भेट दिली.
कार्यक्रम तळदेव येथे पार पडला. यात मांघर केंद्रातील तळदेव, चिखली, मांघर, देवळीमुरा, कळमगाव मुरा, मालुसर, महारोळे, घावरी, विवर, पारुट, बुरडाणी आणि भीमनगर या शाळांमधील विद्यार्थी सहभागी होते.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती आणि मधूसागर सोसायटीचे चेअरमन संजय गायकवाड उपस्थित होते. त्यांनी अंकुश मोरे यांच्या कृतीचे कौतुक केले आणि म्हटले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी परिश्रमाने उत्तुंग यश मिळवत आहेत आणि अंकुश मोरे यांनीही असेच नावलौकिक प्राप्त केले आहे.”
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनीही अंकुश मोरे यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “या ट्रॅकसूटमुळे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल.”
कार्यक्रमाचे आयोजन अरुण कदम यांनी केले होते. विष्णू ढेबे यांनी सूत्रसंचालन केले आणि अभिजित वाडकर यांनी आभार मानले.