दिवाळी पर्यटन हंगामात वेण्णा लेकवर नौका अडकल्या, पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी स्पीड बोटने केले धाडसी बचाव
महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद संचलित वेण्णा लेक बोट क्लब हा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. सध्या दिवाळी सणानिम्मित या बोट क्लबवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे, अशातच रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी वेण्णा लेकवर एक महत्त्वपूर्ण बचावकार्य पार पडले.
दिवाळी पर्यटन हंगामाच्या अनुषंगाने वेण्णा लेक बोट क्लबची तयारी व सुरक्षेची पाहणी करण्यासाठी पालिका प्रशासक योगेश पाटील हे दुपारी १२ वाजता स्पीड बोटीने फेरफटका मारत होते. पाहणीदरम्यान वाऱ्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांच्या दोन पॅडल बोटी कडेला जाऊन अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासक योगेश पाटील यांनी तात्काळ अडकलेल्या बोटींच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी प्रथम पर्यटकांना धीर दिला आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. बोटक्लब इन्चार्ज आबा ढोबळे, कॉम्प्युटर ऑपरेटर सचिन दीक्षित, रमेश आखाडे आणि फारुख महाबळे यांच्या मदतीने प्रशासक योगेश पाटील यांनी स्वतः स्पीड बोट चालवत या दोन पॅडल बोटी बाहेर काढण्यात यश मिळवले. या वेळी बोटीत अडकलेल्या पर्यटकांनी प्रशासक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच महाबळेश्वर नगरपालिकेचे कौतुक करत आभार मानले.
सुरक्षेवर पालिका प्रशासनाचा भर: महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद नेहमीच बोट क्लबच्या माध्यमातून ‘सुरक्षा आणि सेवा’ यावर विशेष भर देत असते. सुरक्षित जलपर्यटनासाठी पर्यटकांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवणे हे नगरपरिषदेचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. नौकाविहार करणाऱ्या सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ बचाव कार्यासाठी एक स्पीड बोट नेहमीच सज्ज ठेवण्यात येते, ज्यामुळे रविवारी वेळेत बचावकार्य करणे शक्य झाले.




