आर्थिक व्यवस्थापन व सुरक्षित गुंतवणुकीबाबत प्रत्येकाने जागृत राहावे-देवेंद्र तरे
गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंबमध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न, ६० प्राध्यापकांचा सहभाग.
लिंब: जीवनात आर्थिक व्यवस्थापन व सुरक्षित गुंतवणुकीचे अचूक नियोजन केले तरच भविष्यातील जीवन खऱ्या अर्थाने सुखकर होईल असे मत आंतरराष्ट्रीय अर्थसल्लागार देवेंद्र तरे यांनी व्यक्त केले. ते लिंब ता.जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापन व सुरक्षित गुंतवणूक या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. धैर्यशील घाडगे, डॉ. भूषण पवार, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. देवेंद्र तरे पुढे म्हणाले की, अडचणीच्या काळात सुरक्षित केलेली गुंतवणूक ही कामी येते त्यासाठी योग्य त्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
प्रारंभी पी.पी.टी.च्या माध्यमातून बँक, पतसंस्था व म्युचल फंड बरोबरच इतर संस्थांमधील आर्थिक गुंतवणूक व मिळणारे व्याजदराबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी देवेंद्र तरे यांचा महाविद्यालयातर्फे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांनी परिश्रम घेतले.
आर्थिक नियोजनाचा विचार न करता केलेला खर्च हे संकटाला निमंत्रण देतात प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार पैशाचे योग्य बचतीचा आराखडा तयार केला पाहिजे. वाढत्या महागाईनुसार कोणत्या वर्षी किती पैशाची गरज भासणार आहे हे ठरवले पाहिजे. विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मुला मुलींच्या लग्नासाठी, तसेच औषधोपचारासाठी तरतुदीचाही विचार करून नियोजन केले पाहिजे.प्रास्ताविक व आभार प्रा. नूतन गवांदे यांनी केले.