उपमुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातच एसटी आगारावर अन्याय!
महाबळेश्वर आगाराला एसटी महामंडळाचा सापत्नभाव; प्रवाशांमध्ये नाराजी
प्रतापगङ : सातारा विभागातील मेढा, सातारा, फलटण, दहिवडी, पाटण आगारात नवीन बस दाखल झाल्या असून, राज्यात नव्हे तर देशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या महाबळेश्वर आगाराला एसटी महामंडळाने अजून एकही नवीन गाडी न दिल्याने जुन्या, कालबाह्य, जीर्ण झालेल्या बसमधून प्रवास करणे दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या नशिबी आले आहे.
सातारा जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांनी आपापल्या तालुक्यात नवीन बस आणल्या असून, महाबळेश्वर तालुक्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत पुनर्वसन मंत्री म्हणून मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळाले असले तरी एसटीचे अधिकारी मंत्र्यांच्या तालुक्यात नवीन बस देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असून, येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण विभागातील सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांना दळणवळणासाठी एसटी बसशिवाय पर्याय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून महाबळेश्वर आगाराला एकही नवीन बस महामंडळाने दिलेली नाही. दुसऱ्या आगारांनी वापरलेल्या जुन्या गाड्या महाबळेश्वर आगाराला देण्यात एसटीचे अधिकारी धन्यता मानत असून, यामुळे जुन्या व कालबाह्य बसेस महाबळेश्वर आगाराच्या माथी का मारल्या जातात, जिल्ह्यात इतर आगारांना नवीन बसेस देण्यात आल्या. मग महाबळेश्वर आगाराला नवीन बसेस मिळण्यासाठी एसटीचे अधिकारी अजून किती वेळ घेणार आहेत, का महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने जुन्या, बंद पडलेल्या बसेसमधून प्रवास करायचा हे एसटीच्या अधिकाऱ्यांनी ठरवले तर नाही ना, असे प्रवाशांनी प्रतिक्रिया दिली
थोड्याच दिवसात उन्हाळी हंगाम सुरू होणार असून, हंगामपूर्वी नवीन बसेस उपलब्ध न झाल्यास एसटी प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा तालुक्यातील प्रवाशांनी दिला आहे.
राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आगार म्हणून महाबळेश्वर आगाराची ओळख असली तरी एसटीचे अधिकारी नेहमीच महाबळेश्वर आगाराला सापत्नभावाची वागणूक देतात.
गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर आगाराला नवीन बसेस मिळाल्या नसल्याने प्रवाशांना प्रवास करताना जुन्या, कालबाह्य बसेसमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
महाबळेश्वर आगाराला बसेस कमी असल्याने लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत.महाबळेश्वर आगाराला नवीन बसेस न मिळाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.नवीन बसेस आल्यास आगाराच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल.एसटीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी महाबळेश्वर आगाराला नवीन बसेस देण्याबाबत तातडीने पाऊले उचलून दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातील प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया:
“महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे येथे नवीन बसेस सुरू करणे आवश्यक आहे.”
“जुन्या बसेसमुळे प्रवासादरम्यान अनेक अडचणी येतात. त्यामुळे नवीन बसेस सुरू करण्याची मागणी आम्ही अनेक दिवसांपासून करत आहोत.”
