दांडेघरचे प्राचीन श्री केदारेश्वर मंदिर
सातारा जिल्ह्यातील श्रावणात करावयाची शिवमंदिरे या लेखमालेतील आजचे चौथे पुष्प…… दांडेघरचे प्राचीन श्री केदारेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील दक्षिण काशी असणारी वाई नगरी आणि वाई परिसरातील नदयांवरचे घाट, वाडे, जुन्या विहिरी, किल्ले, वस्त्रे, शस्त्रे हे सर्व काही आपल्या वैभवकालीन परंपरेचे आणि इतिहासाचे साक्षीदारच आहेत. वाई परिसर नेहमीच आपल्याला भटकंतीचा मनमुराद आनंद देत असतो. वाईपासून जवळच पसरणी घाट, पाचगणी, भिलार, महाबळेश्वर आणि प्रतापगड अशी एकाहून एक सरस असणारी पर्यटन स्थळे आहेत. याच रांगेत आपल्याला वाई-पाचगणी रस्त्यावर पाचगणीपासून तीन कि.मी. अलीकडे डाव्या बाजूला दांडेघर हे एक छोटेसे गाव वसलेले आढळते. मुख्य रस्त्यावर जरी हे गाव असले तरी या गावामध्ये तेराव्या शतकात बांधलेले केदारेश्वराचे मंदिर असून हे मंदिर पाहण्यासारखे आहे.
पसरणी घाट ओलांडून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला हरीसन्स दरी नंतर पहिले गाव लागते तर म्हणजे दांडेघर. या गावात आल्यानंतर गावाच्या मध्यभागी प्रथम आपल्याला एक पार पहायला मिळतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस एक तुळशी वृंदावन आणि पाच दगडी अवशेष आहेत. त्यानंतर जमिनीपेक्षा थोडे खाली असलेले हे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना असणाऱ्या आठ पायऱ्या ओलांडत असताना दोन्ही बाजूला आपल्याला देवडीत मुर्त्या पहायला मिळतात. यातील एका बाजूला देवीची तर दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती पहावयास मिळते. त्यानंतर असणाऱ्या नऊ पायऱ्या उतरल्यानंतरमंदिराच्या डाव्या बाजूस आपल्याला सभामंडप दिसतो. आत जात असताना उजव्या बाजूस कर्मयोगी संत वै. ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांची मूर्ती पहावयास मिळते.त्याच्या पलीकडे गणपतीची सुबक मूर्ती आहे.
पायऱ्या उतरल्यावर मंदिराचे आवार आहे. याच्या दर्शनी भागावर वरच्या बाजूने पत्रे घालून, त्याखाली पूजेच्या साहित्याची काही दुकाने मांडलेली आहेत. मागच्या बाजूला, मंदिरापासून वेगळा, नंदीमंडप आहे. यामध्ये पितळी पत्र्याने मढविलेल्या नंदीची भव्य मीटरभर उंचीची मूर्ती आहे. तसेच या ठिकाणी मोठी घंटाही बांधलेली आहे. या पुरातन मंदिरात जाताना कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. आत जाताना एक छोटे कासव चार नवीन आधुनिक मुर्त्या आणि नंदी आहे. या ठिकाणी बारा घंटा बांधलेल्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला, यात्रेकरूंना उतरण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत.
मंदिराच्या बाजूने फिरताना काही ठिकाणी जमिनीवर मूर्ती कोरलेल्या आहेत. कालौघात नष्ट झालेल्या या मूर्तीचे आज फक्त अस्तित्व जाणवते. या केदारेश्वर मंदिरामागे एक कुंड आहे. त्यात मंदिरातून येणाऱ्या पाण्याची बारमाही संततधार गोमुखातून पडत असते. या कुंडाच्या डाव्या-उजव्या बाजूला छोटेखानी एक मंदिर आहे. त्यात काही वीरगळ आणि शिल्पे ठेवलेली दिसतात.
केदारेश्वराचं मंदिर प्रवेशद्वारावर गणपतीची एक छोटी मूर्ती आहे. हे केदारेश्वराचे मंदिर आवाराच्या मध्यभागी असून त्याला मोठा सभामंडप आहे. त्यातील खांबावर फारसे कोरीवकाम नाही. मंडपात डाव्या बाजूला शिवलिंगावर ठेवले जाणारे शाळुंका आणि नाग यांचे तांब्यांचे मुखवटे आहेत. हा मंडप आवारातील जमिनीपासून एक पायरी खाली आहे. गाभाराही मंडपापेक्षा थोडा खाली आहे. यामध्ये विशाल शिवलिंग असून त्यावरील शाळुंका ही ओबड-धोबड आहे. त्यामधून बारमाही सतत पाणी येत असते. हेच पाणी वाट काढून बाहेर असणाऱ्या कुंडामध्ये सोडलेले आहे. या ठिकाणीही इतर मंदिरांप्रमाणे आतून-बाहेरून रंग चढविलेला आहे.
मंदिराच्या आवारात फिरताना आपल्याला देवीची मूर्ती असणारे एक छोटेसे मंदिर पहायला मिळते. मंदिराच्या बाहेरील बाजूस एक पाण्याचे टाके असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. मंदिराच्या आतून येणारे पाणी बाहेर काढून दिलेले असून ते पाणी लोकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्यासाठी वापरले जाते. तसेच येथून बाहेर पडणाऱ्या पाण्याबद्दल स्थानिक लोक असे सांगतात कि येथील पाणी पसरणीच्या बारवेमध्ये जाऊन मिळते.केदारेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान असून दर सोमवारी या ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणाला भक्तिभावाने तसेच नित्यनियमाने येत असतात.
दत्त जयंतीला श्री केदारेश्वर आणि देवी पार्वती यांचे लग्न लागते. तिथून पुढे पाच दिवस या केदारेश्वर मंदिराची यात्रा गावकरी मोठ्या उत्साहाने भरवितात. या यात्रेसाठी पोळ्यांचा नैवद्य असतो. यावेळी मंदिरात धार्मिक भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम असतो. गावकरी यात मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतात. श्री केदारेश्वर यांचे भाऊ भैरवनाथ यांचे पसरनीला मोठे विशाल असे मंदिर आहे.
दांडेघर हे गाव पाचगणीपासून तीन कि.मी. आणि वाईपासून दहा कि.मी. असल्यामुळे मुक्काम तसेच खाण्या-पिण्याची सोय पाचगणी तसेच वाई ह्या ठिकाणी होऊ शकते. सातारा ते दांडेघर हे अंतर सर्वसाधारणपणे ४२ कि.मी. आहे. जर आपल्याकडे एक दिवसाचा वेळ असेल तर महाबळेश्वर-पाचगणीपासून जवळ असणारे हे ठिकाण पाहून भिलार पाचगणी आणि महाबळेश्वरचा मनमुराद आनंद आपल्याला लुटता येईल.
सहा.प्रा. सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५