दक्ष नागरिक पोलीस मित्रांनी वाहतूक शाखेतील पोलीस बांधवांचा राखी बांधून सन्मान
कराड, दि. १८: कराड शहरात ‘दक्ष नागरिक पोलीस मित्र’ या संघटनेने वाहतूक शाखेतील सर्व पोलीस बांधवांचा राखी बांधून सन्मान केला. पोलिस बांधव हे नेहमीच नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडतात. या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून, राखी बांधून त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी कराड शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मा. संदीप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात दक्ष नागरिक पोलीस मित्रांचे केंद्रीय महासंचालक मा. राजेश भोसले, सांगली जिल्हा अध्यक्ष बोधीसत्व माने, केंद्रीय उप महासंचालक दत्तात्रय जाधव, कराड शहर अध्यक्ष महेश भोसले, रमेश चव्हाण, सौ. सुनीता माने, सौ. लक्ष्मी थोरात, मनिषा शिंदे, पूजा पवार, जयश्री जाधव, आणि अर्चना यादव यांचा सहभाग होता.
सर्व उपस्थितांनी पोलीस बांधवांचे औक्षण करून राखी बांधली. “एक राखी रक्षणकर्त्याला, एक राखी खाकीला,” असा संदेश देत त्यांनी पोलीस बांधवांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ झाले असून, हा सन्मान पोलीस बांधवांच्या कार्याची दखल घेतल्याचे प्रतीक ठरला आहे.
