चिंधवलीच नाव जगाच्या नकाशावर पोहोचेल-डॉ श्री माणिक काका शेडगे.
पाचवड -चिंधवली ता.वाई येथील सौ.तनुजा अजय पवार यांनी विलेपार्ले (मुंबई) येथील नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट औषधीय रसायनशास्त्रात विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली त्यानिमित्ताने त्यांच्या सत्कार समारंभात डॉ श्री माणिक काका शेडगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कोणत्याही विषयावर अभ्यास करून प्रभुत्व मिळवता येते पण त्यांवर संशोधन करणं ही साधी गोष्ट नाही, यासाठी स्वतःला सिद्ध करावेच लागते, तर आणि तरच ते शक्य होत असते, यासाठी जे काही कष्ट घेतले म्हणूनच आज औषधीय रसायनशास्त्रात पदवी संपादन करण्याबरोबरच कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगांवर अभ्यासपूर्ण संशोधन करण्याची जबाबदारी डॉ सौ तनुजा यांनी हाती घेतली, ही नक्कीच पवार-यादव परिवाराबरोबर चिंधवलीसाठी अभिमानाची गोष्ट असून चिंधवलीचे नाव जगाच्या नकाशावर नक्कीच पोहोचेल.त्याचबरोबर साक्षीसुद्धा भविष्यात आपल्या खांद्यावर कर्तृत्ववान स्टार लावून चिंधवलीचे नाव आणखी मोठे करेल.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज मुलींना शिक्षणाची दारं खुली झाली, आज मुली मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक प्रगतीवर आहेत त्यांना घरात बसवून ठेऊ नका तर त्यांच्या दूरदृष्टी विचारांना बळकटी देऊन पाठिंबा द्या, नाहीतर सावित्रीबाई फुले यांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण करून देत त्यांनी अनेक दाखले दिले.कु.साक्षी योगेंद्र पवार हिची ठाणे पोलीस म्हणून निवड झाली याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.
श्री शेवाळे सर यांनी डॉ सौ तनुजा यांच्या दमदार वाटचालीचे कौतुक केले व डॉ श्री माणिक काका लिखित “एक वेडाचा प्रवास” या पुस्तकांची ओळख करून दिली. श्री रमेश पवार दादा यांनी कौतुक करताना सांगितले तू पारगावची लेक असली तरी आमच्या चिंधवलीची सुद्धा आता लेक आहेस आणि आम्ही अभिमानाने तुला डाॅ तनुजा या नावानेच आवाज देणार.
डॉ श्री विजय मोरे यांनी या गौरवास्पद वाटचालीबद्दल भावनिक, अर्थपूर्ण होताना ही चांगल्या विचारांची नांदी आहे कारण चिंधवली गावात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात तिथे सत्यविजय तात्या एक पाऊल टाकत पाठिंबा देत असतात, त्याचबरोबर शैक्षणिक टप्प्यावर नेत्रदीपक चमकणाऱ्या मुलांना आपल्या परीने आर्थिक सहकार्य करून मार्गदर्शन करतात म्हणूनच त्याची ही फलश्रुती आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन करणारे श्री मुकुंदशेठ पवार यांनी डॉ तनुजा यांनी आपल्या अनुभवाचा फायदा या चिंधवली गावातील मुलामुलींना मार्गदर्शनातून करावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ सौ तनुजा यांचे वडील उपस्थित होते त्यांचाही सत्कार करण्यात आला.
गणपती उत्सवानिमित्त दिपक पवार यांनी आकर्षक देखाव्यातून “क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची मुलींची पहिली शाळा” साकारली होती.त्यास डॉ श्री माणिक काका आणि चिंधवली ग्रामस्थांनी भेट देऊन विशेष कौतुक केले व सर्वांना हा देखावा पाहण्याचे आवाहन केले.याप्रसंगी चिंधवली गावातील महिला व पुरुष ग्रामस्थांनी डॉ सौ तनुजा व कु. साक्षी यांचा सत्कार केला, यावेळी चिंधवलीतील लहान थोर महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.