बोपर्डीतील तालुका वाई श्री भीमाशंकर मंदिर
वाई तालुक्यात असलेल्या बोपर्डी येथील भीमाशंकर मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना मानले जाते. एका छोट्याशा गावात असलेल्या या मंदिराची स्थापत्यशैली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बोपर्डी असाही या गावचा लौकिक प्रसिद्ध आहे. पांडवांच्या वास्तव्याच्या विविध आख्यायिकाही इथे सांगितल्या जातात.
वाई-भोर रस्त्यावर एमआयडीसीचा परिसर ओलांडला की बोपर्डी हे गाव येते. बोपर्डी गावाच्या एका टोकाला हे भीमाशंकर मंदिर आहे. या मंदिराच्या भोवतालचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. बोपर्डी गावातून मंदीराकडे येत असताना आपल्याला या गावातील श्री मारुती मंदिर आणि श्री जानुबाई मंदिर लागते. त्यानंतर आपण या मंदिराकडे येतो. मंदिराकडे येत असताना बाहेरील बाजूस एक दगडी समाधी लागते. त्यानंतर भीमाशंकर देवालयाच्या प्राचीन दगडी प्रवेशद्वार लागते.
या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस गणेशपट्टी तर खालील बाजूस किर्तीमुख आहे. दगडी प्रवेशद्वारातून पाच पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपल्याला हेमाडपंथी धाटणीचे भीमाशंकर मंदिर पहावयास मिळते. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठा पार असून त्यात मोठा वृक्ष आहे.
भक्कम अशा दगडी प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर मंदिराचा सुरेख परिसर आहे. हे मंदिर वाईच्या महागणपतीनंतर एका दशकात रास्ते यांच्याकडे लेखनिक असणारे आनंदराव लक्ष्मण बोपर्डीकर यांनी पेशव्यांच्या व सरदार रास्ते यांच्या मदतीने १७९९ मध्ये बांधण्यात आलेले आहे. कोल्हापूरच्या छ. शाहू महाराज, पेशवे आणि रास्ते यांच्याकडून या मंदिराला सनद मिळालेली आहे.
या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला दगडी प्रवेशद्वारातून आत यावे लागते. हे प्रवेशद्वार हे अंदाजे सात फुट उंच आणि पाच फुट रुंद असे आहे. चारी बाजूंनी असलेली दगडी आणि मजबूत तटबंदी तसेच भोवतालच्या पायऱ्या हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या मंदिराभोवती पाणी असते. या मंदिर परिसरात तीन कुंडे आहेत आणि स्वयंभू शिवपिंड आहे. गाभाऱ्यातील कुंडातून बाहेरील पहिल्या कुंडात पाणी जाते. गाभाऱ्यातील कुंडातील पाणी देवाला घालण्यासाठी वापरले जाते. बाहेरच्या दुसऱ्या कुंडातील पाणी पिण्यासाठी तर तिसऱ्या कुंडातील पाणी हातपाय धुण्यासाठी वापरले जाते.
मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला प्रथम कोरीव नंदीमंडप पहावयास मिळतो. यामधील नंदीची दगडी मूर्ती सुरेख आणि आकर्षक आहे. मुखमंडप, गर्भगृह अन् स्वतंत्र नंदीमंडप अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य मंडपास एकूण आठ स्तंभ आहेत. त्यापैकी चार अर्धस्तंभ आहेत. त्यावर वैविध्यपूर्ण शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवलिंग आहे.
मंदिराचे शिखर अन् त्यावरचे कोरीवकाम अगदीच लक्षवेधक ठरते. त्यात प्रामुख्याने देवदेवतांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस स्वतंत्र नंदीमंडप आहे. तो पाच फूट लांबी, रुंदीचा अन् दोन फूट उंचीचा आहे. मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दोन्ही बाजूस सुमारे वीस फूट उंचीच्या दोन आकर्षक दीपमाळा आहेत. दीपमाळसमोर दगडी प्राचीन तुळशी वृंदावन आहे. मंदिराला खाली उतरण्यासाठी सर्व बाजूंनी पायऱ्या आहेत. मंदिर परिसरात पाण्याची दोन कुंडे आहेत. मोठ्या कुंडात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. ही कुंडे वर्षभर पाण्याने भरलेली असतात.
मंदिरात आत जात असताना डाव्या बाजूला श्री बजरंगबली हनुमानाची मूर्ती भिंतीत कोरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला गरुडाची मूर्ती आहे. गर्भगृहात प्रवेश करताना वरील बाजूस गणेशपट्टी तर खालील बाजूस कीर्तिमुख आहे. आत जाताना तीन पायऱ्या उतरून खाली आल्यावर आपल्याला शिवपिंडी पहावयास मिळते. त्यावर सतत जलाभिषेक होत असतो त्याच्या पाठीमागील बाजूस कोनाड्यात पार्वती मातेची मूर्ती आहे तसेच भगवान शिवशंकर यांची पितळी मूर्ती आहे त्या शेजारी पितळी शिवपिंडी असून या ठिकाणी समई तेवत असते.
या मंदिरात वाहिवाटदार कै. भीमाशंकर बोपर्डीकर दर श्रावणात प्रत्येक दिवशी लघुरुद्र आणि नैवेद्य दाखविला जातो आणि चैत्रात पाडव्या दिवशी निशाण उभारले जाते. श्रावण महिन्यात इथे विविध प्रकारचे धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. महाशिवरात्रीलाही भाविकांची मोठी गर्दी होते. या मंदिरात महाशिवरात्री दिवशी अकरा ब्राह्मणाकरवी श्रींचा महारुद्र अभिषेक केला जातो. त्यासोबत मंदिर परिसरात भजनी मंडळीचा जागर असतो. यामध्ये बोपर्डीकर ग्रामस्थ अतिशय भक्तिभावाने या उत्सवात सहभागी होतात.
माही शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोपर्डीकर आणि पंचक्रोशीतील भक्तगणांच्या साठी महाप्रसादाचे नियोजन केले जाते. याचा सर्व खर्च या मंदिराचे वाहिवाटदार कै.भीमाशंकर बोपर्डीकर यांचे कुटुंबीय करतात. श्रावणी सोमवार महाशिवरात्री आणि प्रत्येक महिन्याचा प्रदोष या दिवशी भाविकांची या ठिकाणी गर्दी असते. त्याचप्रमाणे या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण असते. या मंदीर परिसरात भरपूर झाडे असल्याने हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी आहे. सध्या या मंदिराची स्वच्छता आणि देखभाल श्री. गिरीश भीमाशंकर बोपर्डीकर हे पाहतात.
याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते कि या मंदिरात येणारे पाणी पश्चिमेस असणाऱ्या पांडवगड येथील तळ्यातून आणलेले असून तेथील तळ्यात लिंबू टाकले असता ते लिंबू येथून निघते असे ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर वाई शहरापासून अगदीच नजीक आहे. बोपर्डीतून पुढे घाट चढून प्रसिद्ध मांढरदेवी मंदिराकडे जाता येते. वाटेतच पांडवगड किल्ल्याकडे जाणारा मार्गही आहे.
वाई परिसर दर्शनच्या या सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला वाई परिसरातील कृष्णा नदीघाटावरील महागणपती, काशी विश्वेश्वर मंदिर, भद्रेश्वर मंदिर, मेणवली येथील मेणेश्वर मंदिर आणि नाना फडणवीस वाडा, धोम धरण, पसरणी येथील शेख मिरे यांचा ऐतिहासिक वाडा याशिवाय पांडवगड, वैराटगड, कमळगड, मांढरदेवी अशी ठिकाणे आपल्यास पहाता येतात.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५
