कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन
कराड -महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे हस्ते कृषी महाविद्यालय, कराडच्या सैदापूर येथील कृषी विभागाकडून शासन निर्णयाव्दारे नव्याने हस्तांतरित झालेल्या जमिनीचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील यांनी माननीय कुलगुरू महोदय यांचे स्वागत केले.
कृषी महाविद्यालय, कराडची स्थापना सन २०१३ साली झाली. स्थापनेवेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडील कराड तालुका बीजगुणन केंद्र, सैदापूर येथील १० हेक्टर जमीन महाविद्यालयास हस्तांतरीत करणेचा प्रस्ताव होता. त्यानुसार सैदापूर येथील १० हेक्टर क्षेत्र शासननिर्णयानुसार कृषी महाविद्यालय, कराडला हस्तांतरित करण्यात आले. त्यानुषंगाने आयोजित जमिनीचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पी. जी. पाटील यांनी सैदापूर येथील प्रक्षेत्राची पाहणी केली तसेच महाविद्यालयाकडील जमिनीबाबतचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या उपक्रमांचा व सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कामकाजाबातचा आढावाहीत्यांनी याप्रसंगी घेतला. महाविद्यालयासमोर असणा-या अडचणी समजून घेत आदरणीय कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
भविष्यात शेतक-यांच्या मागणीनुसार सदर प्रक्षेत्रावर सोयाबीन, गहू, हरभरा अशा विविध पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविल्यास त्याचा फायदा परिसरातील शेतक-यांना होईल असे मत कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केले. तसेच या प्रक्षेत्रावर उत्कृष्ट प्रतीचे बियाणे तयार करून ते शेतक-यांसाठी उपलब्ध करून व्हावे यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचा-यांनी कसोशीने प्रयत्न करावेत अशी सूचनाही माननीय कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केली.
डॉ. एस. आर. पाटील यांनी सैदापूर येथील जमिनीवर यावर्षी ऊसाच्या विविध वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्याचे नियोजित असल्याचेसांगितले. याप्रसंगी मागील दहा वर्षांमध्ये जमीन हस्तांतरणासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांविषयीची तसेच सैदापूर प्रक्षेत्राची सर्वांगीण माहिती कृषी सहाय्यक श्री. एन. आर. डीसले यांनी दिली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. एस. आर. पाटील यांनी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे आभार व्यक्त केले.
