बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा! देशही सोडला
ढाका: बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून यामध्ये आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, तरीही येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. यानंतर आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानांचा राजीनामा दिला असल्याचं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
तसेत पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला असून त्या हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं वृत्तही समोर येत आहे. त्या भारतात येण्याशी शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर तेथील लष्कर प्रमुख मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी तेथील लष्कराकडून प्रयत्न सुरु असून बांगलादेशमधील इंटरनेट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी तेथील लष्कराकडून प्रयत्न सुरु असून बांगलादेशमधील इंटरनेट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत होती. यासंदर्भात लखोंच्या संख्येनी आंदोलकांनी ढाका शहरात मोर्चा काढला. तसेच शेख हसीना यांच्या कार्यालयावरही आंदोलक दाखल झाले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे शेख हसीना यांनी त्यांच्या बहिणीसह देश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याचं सांगण्यात येत आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्दा तापलेला आहे. दरम्यान यावरून आज पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली
याशिवाय काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.