उपलब्ध माहिती देणे हे कर्तव्य – ओमकार पाटील माहिती अधिकार अधिनियम’ प्रबोधन कार्यशाळा संपन्न
-दिशा विकास मंच आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून आयोजन
सातारा प्रतिनिधी-माहिती अधिकार अधिनियम हा प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी उपयुक्त आहे. कार्यालयात उपलब्ध माहिती देणे, हे कर्तव्य असून जशी उपलब्ध तशीच माहिती योग्य अर्ज असल्यास द्यावी. माहिती नाकारण्यापेक्षा देण्याची मानसिकता हवी. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना अधिनियमाच्या कलमांचे ज्ञान हवे आहे. ज्ञान असेल तर अडचण, भिती वाटणार नाही.योग्य अर्ज असेल तर उपलब्ध माहिती लवकरात लवकर द्या, ” असे आवाहन यशदा – पुणे चे प्रविण प्रशिक्षक ओमकार पाटील यांनी केले.
सामाजिक क्षेत्रात गेली १५ वर्षे सामाजिक कार्याबरोबर माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या दिशा विकास मंच’ने पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.८ जागतिक महिला दिनानिमित्त सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी ,अपिलीय अधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्यांसाठी माहिती अधिकार अधिनियम याबद्दल “नको भिती, हवी माहिती” या टॅग लाईनवर आधारित, “माहिती अधिकार अधिनियम प्रबोधन कार्यशाळा आयोजित केली होती. सातारचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याहस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशदाचे प्रविण प्रशिक्षक ओमकार पाटील यांनी, माहिती अधिकार अधिनियमामुळे प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि खुलेपणा निर्माण झाला आहे. गतीमान प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांना अधिनियम महत्वाची कलमे, तरतुदीबाबत परिपूर्ण ज्ञान हवे, असे सांगून कायदेशीर कलमांची माहिती, तरतुदी याबाबत उदाहरणे देत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. सहभागी महिला अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक शंकांचे निरसन यावेळी ओमकार पाटील यांनी केले.
प्रास्ताविक करताना ‘दिशा विकास मंच’चे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी गेली १५ वर्षे केलेल्या कार्याची माहिती दिली. स्वागत, सुत्रसंचलन प्राचार्य विजय जाधव तर आभार डॉ. स्वाती लोंढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इरफान शेख, सुदर्शन गवळी, मुद्रा जाधव, ॲडी रावळ आदींनी परिश्रम घेतले.
समाजरत्न पुरस्कार
दिशा विकास मंच वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकीतून कार्य करणाऱ्या संस्थांना समाज रत्न पुरस्कार दिले जातात. यावेळी आरंभ बहुउद्देशीय संस्था सातारा, संवाद सोशल रिसर्च आणि डेव्हलपमेंट फाउंडेशन, सातारा आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था ,बार्शी (सोलापूर)या संस्थांना मनोज शेंडे, ओमकार पाटील, विजय जाधव, सुशांत मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
