न्यायाधीशाला लाच घेण्यासाठी मुंबईचा सहायक फौजदार करत होता मदत ! सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन अर्ज मंजुर करण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत ५ लाख रुपयांची लाच घेण्याची मागणी केल्याबद्दल अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात किशोर संभाजी खरात हा खासगी व्यक्ती नसून तो मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस फौजदार असल्याचे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांना फसवणुक प्रकरणात अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा जामीन मंजूर करण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या वतीने किशोर खरात व आनंद खरात यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. ५ लाख रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असताना या खासगी व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी ५ लाख रुपयांची रक्कम न स्वीकारताना ते पळून गेले होते. या दोघांचा शोध घेत पोलीस त्याच्या मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीतील घरात गेले. परंतु, ते तेथे आढळून आला नाही. घरी केलेल्याचा चौकशीत तो मुंबई पोलीस दलात असून सध्या वरळीतील ल विभाग २ येथे सहायक फौजदार म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.