वाई जिमखाना वाई आयोजित स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा दिमाखदार समारोप –
वाई जिमखाना वाई व किसान वीर महाविद्यालय वाई आयोजित स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त “जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा – पर्व दुसरे” या भव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हाभरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेदरम्यान चुरशीचे सामने, खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांची उपस्थिती यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते.
समारोप समारंभास सातारा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री. सुधाकर शानबाग, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक श्री. सुरेश सादले, सातारा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. राजदीप माजगावकर, श्री. मनोज कांन्हेरे, उपसचिव श्री. निलेश फणसळकर, किसनवीर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गुरुनाथ फगरे तसेच उद्योजक श्री. मोहन आबा भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेतील ९ वर्षांखालील मुलांच्या गटात विराज फुले याने विजेतेपद पटकावले तर रिषित कदम याने उपविजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात दिविरा सावंत हिने विजेतेपद मिळवत रिया पिसाळ हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.११ वर्षांखालील मुलांच्या गटात अक्षय कोल्हापुरे याने विजेतेपद मिळवले तर प्रत्यूष पवार हा उपविजेता ठरला. मुलींच्या गटात आरोही अर्जुगडे हिने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर जीयारा दोषी हिने उपविजेतेपद मिळवले.१३ वर्षांखालील मुलांच्या गटात विराज अर्जुगडे याने विजेतेपदावर नाव कोरले तर अभय कोल्हापुरे याने उपविजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात आराध्या हगवणे हिने विजेतेपद पटकावत विभावरी कांबळे हिला उपविजेतेपद मिळाले.१५ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक भोसले याने विजेतेपद मिळवले तर आराध्य पवार उपविजेता ठरला. मुलींच्या गटात श्रद्धा इंगळे हिने विजेतेपद पटकावत रसिका पवार हिला उपविजेतेपद मिळाले.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्जुन जाधव याने विजेतेपद मिळवले तर कौस्तुभ फुले उपविजेता ठरला. मुलींच्या गटात श्रद्धा इंगळे हिने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले तर सूर्या कणसे हिने उपविजेतेपद मिळवले. याच गटातील दुहेरी सामन्यांमध्ये अर्जुन जाधव आणि देवांश रैनाक या जोडीने विजेतेपद पटकावले, तर कौस्तुभ फुले आणि शरव लोखंडे ही जोडी उपविजेती ठरली.१९ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयांस फणसळकर याने विजेतेपद मिळवले तर कौस्तुभ फुले उपविजेता ठरला. मुलींच्या गटात श्रद्धा इंगळे हिने विजेतेपद मिळवत शर्वरी मोरे-पाटील हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.११ वर्षांखालील दुहेरी गटात कनक जोशी आणि वरद कोल्हापुरे या जोडीने विजेतेपद पटकावले, तर अन्वय हवळ आणि कौस्तुभ फुले ही जोडी उपविजेती ठरली.मेन्स डबल्स ५५ वर्षे गटात अवधूत जोशी आणि संजय भागवत या जोडीने विजेतेपद पटकावले, तर नंदकुमार चोरगे आणि सायमन नडार या जोडीने उपविजेतेपद मिळवले. मिक्स डबल्स गटात अभिषेक मोहिते आणि अनन्या काटे या जोडीने विजेतेपद पटकावले, तर नरेंद्र जगताप आणि सूर्या कणसे ही जोडी उपविजेती ठरली. मेन्स डबल्स गटात अभिषेक मोहिते आणि श्रीधर तपासे या जोडीने विजेतेपद मिळवले, तर अथर्व मोहिते आणि शंतनू दिवेकर या जोडीने उपविजेतेपद मिळवले.मेन्स सिंगल्स गटात अभिषेक मोहिते विजेता ठरला तर नरेंद्र जगताप उपविजेता ठरला. मेन्स डबल्स ३५ वर्षे गटात निलेश फणसळकर आणि वैभव फुले या जोडीने विजेतेपद मिळवले, तर विक्रम राजपूत आणि रोहन शेलार या जोडीने उपविजेतेपद पटकावले.
या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वाई जिमखान्याचे अध्यक्ष अमर कोल्हापुरे यांनी विशेष पुढाकार घेतला. स्पर्धा प्रमुख वैभव फुले यांनी स्पर्धेचे नियोजन, वेळापत्रक, व्यवस्थापन आणि समन्वय अत्यंत प्रभावीपणे सांभाळला. आयोजनात अमीर बागुल आणि सायमन नडार यांनीही मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रीती कोल्हापुरे यांनी प्रभावी आणि आकर्षक शैलीत केले.
स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाई जिमखाना व किसान वीर महाविद्यालय वाई तर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आणि जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणारी ठरली.




