कराड शेणोली येथे शॉर्ट सर्किटमुळे 11000 वोल्टच्या लाईनला आग, घरातील 15 जण थोडक्यात बचावले!
शेणोली, ता. कराड: शेणोली येथे शहानवाज मुल्ला यांच्या घरावर सोमवारी रात्री 1 वाजता शॉर्ट सर्किटमुळे 11000 वोल्टच्या मेन एक्स्टेंशन लाईनला भीषण आग लागली. या घटनेत घरावरील विद्युत साहित्य जळून खाक झाले असून, घरात झोपलेल्या 15 जणांचा जीव थोडक्यात बचावला. यात लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक आग लागल्याने एकच घबराट व गोंधळ निर्माण झाला.
या लाईनसंदर्भात रहिवाशांनी वारंवार महावितरण (MSEB) कडे तक्रारी आणि अर्ज दिले होते, तरीही दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रकार याआधीही दोनदा घडला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
घटना घडताच गोंधळ घबराट आरडाओरडा निर्माण झाला. सदरची घटना पाहताच वीज कर्मचारी विशाल विजय गायकवाड व समीर मुल्ला,पोलीस पेट्रोलिंग करणारे कर्मचारी खाडे साहेब व इतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी धाडसाने मेन लाईट बंद केली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. सदर च्या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून नोंद घेतली असली तरी MSEB प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी आता या धोकादायक लाईन कारण सुरक्षित लाईट व्यवस्था करावी.
गेल्या काही दिवसांपासून MSEB च्या हलगर्जीपणामुळे वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या संदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोक आंदोलनाचा इशारा देत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
