सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ शेतकरी एकवेळ समझोता योजनेस पात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी याद्या प्रसिद्ध
३१ मार्च २०२७ पर्यंत रक्कम भरण्याची मुदत
सातारा, दि. २० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) योजनेसाठी सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५७ गावांमधील या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून आपल्या हिश्श्याची रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत भरावी, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील ४१ हजार ५२६ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी ३६ हजार ८६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २५२ कोटी ८८ लाख रुपयांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे. अद्याप आधार प्रमाणीकरण न केलेल्या ४ हजार ६६० शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन सहकारी विभागाकडून करण्यात आले आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४ हजार ६६० आणि इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे १ हजार ११८ असे एकूण ५ हजार ५७८ शेतकरी पात्र ठरले आहेत.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देत एकवेळ समझोता अंतर्गत निश्चित केलेल्या थकबाकीच्या रकमेपेक्षा जादा रक्कम कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून वसूल करू नये, असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर संबंधित बँकेने त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक आहे. बँकांकडून दर शुक्रवारी ही माहिती पोर्टलवर अपलोड करून त्याबाबत शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे. महाआयटीमार्फत माहितीची पडताळणी झाल्यानंतर थकबाकी अद्ययावत झाल्यापासून तीन दिवसांनी संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या योजनेच्या निकषांनुसार ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य असल्याने केवळ ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून घ्यावी. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही यापुढे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशीही माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी ही माहिती दिली.



