महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटणार; बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ प्रकल्पास परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील
महाबळेश्वर प्रतिनिधी –जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरातील पर्यटकांची वाढती गर्दी आणि अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची गंभीर समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘महाबळेश्वर बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ विकास प्रकल्पाबाबत’ आज मंत्रालय, मुंबई येथे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या प्रकल्पास परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शहरातील सद्यस्थितीची माहिती दिली. महाबळेश्वरमध्ये सुट्ट्यांच्या काळात आणि पर्यटन हंगामात अपुऱ्या पार्किंगमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा व गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतर्फे बस आगार येथे विकसित करण्यात येणाऱ्या नवीन आणि आकर्षक वाहनतळाच्या आराखड्याचे (Layout Design) सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे आर्किटेक्ट स्वप्नील संकपाळ आणि संतोष टिपूगडे देखील उपस्थित होते.
या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले की, “या नवीन वाहनतळामुळे महाबळेश्वरमधील ट्रॅफिकची गंभीर समस्या सुटण्यास मोठी मदत होणार असून, देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेत मोठी भर पडेल आणि त्यांची गैरसोय टळेल.”
प्रकल्पाचे सादरीकरण पाहिल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पास अनुकूलता दर्शवली. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, या कामाचा सविस्तर प्रस्ताव तातडीने नगरविकास व परिवहन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांना दिले आहेत.
या महत्त्वपूर्ण बैठकीस परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक (बांधकाम) आणि परिवहन मंत्र्यांचे खाजगी सचिव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शासनाकडून या प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लवकरच पुढील तांत्रिक कार्यवाही वेगाने पूर्ण होऊन महाबळेश्वरच्या विकासात या भव्य वाहनतळाची भर पडणार आहे.



