कूपर कॉर्पोरेशन’चा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी गौरव
सातारा प्रतिनिधी -सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कूपर कॉर्पोरेशनने राष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवत प्रतिष्ठेच्या ‘मॅन्युफॅक्चरिंग टुडे अॅवार्ड २०२६’ मध्ये दोन मानाचे पुरस्कार पटकावले. मुंबई येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात कंपनीच्या IT विभागाने ‘एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी २०२६’ या श्रेणीत उपविजेतेपद (रनर-अप) मिळविले, तर E1 प्लांटनेदेखील ‘एक्सलन्स इन ऑपरेशन्स २०२६’ या श्रेणीत उपविजेतेपद (रनर-अप) पटकावले.
उद्योग क्षेत्रातील नावाजलेले मासिक ‘मॅन्युफॅक्चरिंग टुडे’ यांच्या वतीने या राष्ट्रीय पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. उत्पादन क्षेत्रातील खर्च अनुकूलन, अभियांत्रिकी रचना, पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा (EHS), मानव संसाधन, नवोपक्रम, कार्यसंचालन, गुणवत्ता, पुरवठा साखळी, शाश्वतता आणि चक्रीय अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, गोदाम आणि औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क, सायबर सुरक्षा, वर्षातील सर्वोत्कृष्ट उत्पादन संघ यामधील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कूपर कॉर्पोरेशनच्या IT विभागाने सायबर सुरक्षा क्षेत्रात राबविलेल्या प्रभावी उपाययोजना, सुरक्षित डिजिटल प्रणाली, माहिती व डेटा संरक्षण तसेच तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्थेमुळे ‘एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी’ हे विजेतेपद मिळविले. डिजिटल युगातील वाढत्या सायबर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने उभारलेली सक्षम आणि सुरक्षित डिजिटल कार्यप्रणाली या यशामागील महत्त्वाचा घटक ठरला. दुसरीकडे, कूपर कॉर्पोरेशनच्या E1 प्लांटने उत्पादन कार्यक्षमतेत सातत्यपूर्ण सुधारणा, उच्च दर्जाची गुणवत्ता, उत्पादकता वाढ, वेळेवर ग्राहकांना उत्पादन पुरवठा, ऑटोमेशन, टीपीएम, कायझन आणि लीन आधारित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर ‘एक्सलन्स इन ऑपरेशन्स २०२६’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.
या दुहेरी राष्ट्रीय यशाबद्दल कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख कूपर यांनी IT विभाग आणि E1 प्लांटमधील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी तसेच संबंधित टीमचे अभिनंदन केले.



