पुस्तकांच्या गावात ‘मराठीचे अद्वैतरंग’अभिजात मराठीचा अभिमान, ‘मराठीचे अद्वैतरंग’ चा रंगमंचीय संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम
भिलार-अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिर सभागृहात ‘मराठीचे अद्वैतरंग’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्व रसिकांसाठी खुला आहे.
अभिजात मराठी भाषा, संतसाहित्य, अभंग, शास्त्रीय संगीत, कथ्थक नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख संगम असलेल्या या नाट्यप्रयोगातून पंढरीच्या वारीची परंपरा, वारकरी संप्रदायाचा भक्तिभाव आणि संतांच्या शिकवणीतील माणुसकी, समानता व जीवनमूल्यांचे दर्शन घडणार आहे. एका वयोवृद्ध वारकरी आणि तरुणाच्या संवादातून दोन पिढ्यांमधील नाते आणि वारीचे आध्यात्मिक महत्त्व उलगडले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे लेखक राजीव मुळे, दिग्दर्शक व अभिनेते सौरभ भिसे, कलाकार – शास्त्रीय गायक वैभव फडतरे, तबलावादक मिलिंद देवरे, हार्मोनियम वादक अमित जगदाळे, तुषार क्षीरसागर, टाळवादक किरण सावंत, नृत्यदिग्दर्शिका मानसी सदामते, अभिनेते निरंजन जोशी आणि बालकलाकार कल्याण कुलकर्णी सहभागी होणार आहेत. निनाद जगदाळे, ऐश्वर्या पलंगे, नमिता भिडे, ऐश्वर्या सरनाईक, मानसी चव्हाण आणि मुकुला पतकी हे नृत्यकलाकार सादरीकरणात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, डॉ. शामकांत देवरे यांनी दिली. मराठी भाषेचे वैभव आणि संतपरंपरेचा सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



