आपापसातील वाद सामोपचाराने मिटविणे आणि लवकर न्याय मिळवून देणे हे लोक अदालतीचे उद्दिष्ट –न्यायमूर्ती राजेश पाटील
सातारा – संवादाच्या माध्यमातून वाद मिटल्याने पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. त्यामुळे नागरिकांमधील वाद सामोपचाराने सोडवणे आणि जलद न्याय मिळेल असे लोक अदालतीचे उद्दिष्ट असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्हा पालक न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन न्यायमूर्ती श्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, सातारा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद एस. वाघमारे, जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शिनी वाघमारे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील, विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी न्यायमूर्ती श्री. पाटील म्हणाले की, लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, लोकअदालतीमध्ये प्रकरण गेले म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत संपवायचे, असा त्याचा अर्थ नाही. पक्षकारांच्या संमतीने समाधानकारक तोडगा निघत असेल तरच प्रकरण निकाली काढले जाते. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.वादाचा शेवट करून नाती दृढ व्हावीत, नाती जुळावीत आणि दोन्ही पक्षकारांना समाधान मिळावे, हे लोकअदालतीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या तुलनेत लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा जलद आणि आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर पद्धतीने निपटारा होऊ शकतो. तडजोडीस पात्र असलेले विविध दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे वाद लोकअदालतीमध्ये सामंजस्याने सोडविता येतात.
संवादाच्या माध्यमातून वाद मिटल्याने पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. त्यामुळे नागरिकांनी आपापसातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी लोकअदालतीच्या माध्यमाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद एस. वाघमारे म्हणाले की, लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्यात पक्षकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संवादाच्या माध्यमातून वादावर समाधानकारक तोडगा काढणे हा लोकअदालतीचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातत्याने काम करत असून, लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




