५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ज्ञान संस्कृतीचे दीपस्तंभ

सातारा- त्यागनिष्ठेतून समाजाची वैचारिक प्रगल्भता वाढविणे व या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ही शिक्षकांना समाजात अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. शिक्षक हा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व नैतिक मूल्य शिक्षणाचा खरा पाया आहे. सामाजिक ऐक्य व बांधिलकी बरोबरच समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा,अज्ञान,अंधश्रद्धा या अविचारी प्रवृत्तीची प्रतिकार करण्याचे सामर्थ्य देणारी ही एक ऊर्जा रुपी शक्ती आहे. शिक्षक हा जसा समाजाला अचूक दिशा देण्याचे कार्य करतो. तसेच तो नवी पिढी सक्षम घडवण्यामध्येही योगदान देत असतो. समाजाच्या व राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शिक्षकांचा नेहमीच पुढाकार राहिल्याने आजच्या युगातही शिक्षकांबद्दल विशेष आदर व आपुलकीची भावना कायमच समाजामध्ये राहिले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना गुरुस्थानी सन्मान दिला जातो. हा नेहमीच शिष्यांना आदर्श विचारांची कृतीची परंपरा जोपासण्याची शिकवण देत असतो. वैचारिक मूल्यातून खऱ्या अर्थाने समाजाचा उत्कर्ष हा घडत असतो. संपूर्ण भारतात ज्ञानसंस्कृतीचे उपासक म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा संपूर्ण देशभर शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्ञान चैतन्य व उत्साहाचा महासागरच म्हणून विज्ञान युगात ही मोठ्या आदराने शिक्षकांकडे पाहिले जाते. ज्ञानसंस्कृतीचे दीपस्तंभ ठरलेले भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे मूळचे हाडाचे शिक्षक होते.
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अतूट व स्नेहबंध जोडणारे ते एक शिक्षक होते. अत्यंत प्रतिकूल तेशी झगडत व आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्यांनी प्राध्यापक. प्राचार्य. कुलगुरू. या पदापर्यंत झेप घेतली. शिक्षणातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी ही जीवनात जोपासली. त्यांच्या सामाजिक जीवनातील कार्यकर्तृत्वाची दखल त्या काळात घेऊन त्यांना रशियातील राजदूत म्हणून भारत सरकार तर्फे नेमणूक करण्यात आली. हाडाचे शिक्षक असणारे भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या क्षेत्रातही त्यांनी उमटवला. पुढे त्यांना भारताचे उपराष्ट्रपती पद तसेच भारताचे सर्वोच्च स्थान असणारे राष्ट्रपती या सर्वोच्च स्थानावर ते विराजमान झाले. एका शिक्षकासाठी हा मिळालेला सर्वात मोठा सन्मान ठरला आहे. साहित्य कला संगीत व राजकारण त्याचबरोबर तत्त्वनिष्ठ विचाराची बांधिलकी ही भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी संपूर्ण आयुष्यभर जोपासली. राष्ट्र सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. ज्ञान संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल घडविले म्हणूनच त्यांना ज्ञानसंस्कृतीचे उपासक म्हणून संबोधले जाते. प्राध्यापक ते भारताचे राष्ट्रपती होण्याचा बहुमान हा एका शिक्षकाला मिळाला अर्थात भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे या पाठीमागील कठोर परिश्रम तीतकेच महत्त्वपूर्ण ठरले आहेत. तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक,वैचारिक प्रगल्भता, व्यावहारिक ज्ञान, चातुर्य या गुणांचा सुरेख संगम त्यांनी जीवनात साधला होता. संपूर्ण जगात भारतीय संस्कृती बद्दल हेवा वाटावा असे कार्य त्यांनी करून दाखवले आहे. त्यांचा जन्मदिनहा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो,यातच त्यांचे कर्तुत्व दिसून येते. शिक्षक दिन हा प्रत्येक शिक्षकांसाठी एक अस्मरणीय दिवस असतो. तसेच गुरु शिष्य परंपरेच्या अतूट नाते व परंपरा जोपासणारा हा दिवस असतो. भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक संवेदनशील मनाचे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षकांच्या व्यथा बरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची अचूक पारख असणारे ते एक कुशल प्रशासक होते. त्याग व निष्ठेचे ते खरे प्रतीक होते. भारतीय शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देण्याबरोबरच राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला पूरक ठरणारे शिक्षणाचे ते खरे पाईक होते. स्वतः शिक्षिके वृत्तीचे असल्यामुळे ज्ञानसाधना व ज्ञान संस्कृतीला नेहमीच त्यांनी बळ देऊन खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची जपणूक केली आहे.
श्रीरंग काटेकर सातारा.




