उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था वाई या संस्थेच्या ताब्यातील फ्लॅटमध्ये सील तोडून अनाधिकृत घुसखोरी करून प्रवेश; कर्ज वसुली अधिकारी यांना धमकी वाई पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वाई : कर्ज थकबाकीच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रियेनंतर उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्या ताब्यात दिलेल्या फ्लॅटचे सील व कुलूप तोडून अनधिकृत घुसखोरी करून प्रवेश केल्याप्रकरणी तसेच संस्थेच्या कर्ज वसुली अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाईचे कर्ज वसुली अधिकारी उदय लक्ष्मण घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संस्थेचे कर्जदार यशवंत गेनूबा गोळे आणि सहकर्जदार उमेश यशवंत गोळे यांनी तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी मधली आळी वाई येथील सि. स. नं ३५५ या मधील साई पॅलेस इमारतीतील फ्लॅट नं ६ या सील करण्यात आलेल्या फ्लॅटचे कुलूप व सील तोडून त्यामध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे.
संबंधित फ्लॅट कर्जासाठी तारण ठेवण्यात आला होता. कर्जाची थकबाकी झाल्यानंतर संस्थेने वसुलीसाठी विहित कायदेशीर प्रक्रिया राबविली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत तसेच कलम १०१ अन्वये वसुलीची प्रक्रिया राबवून, कलम १५६ व त्याअंतर्गत नियम १०७ अन्वये संबंधित मिळकतीच्या ताब्याची कार्यवाही करण्यात आली होती. या कायदेशीर प्रक्रियेनंतर सदर फ्लॅटचा ताबा उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेकडे आला होता. मालमत्तेची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी संस्थेकडून सुरक्षा रक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली होती. नेमणुकीस असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटल भरती करण्यात आले ह्याचा गैर फायदा घेऊन त्याच मध्यरात्री २.३० ते सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संबंधितांनी फ्लॅटचे सील व कुलूप तोडून आत प्रवेश केला. याबाबत जाब विचारला असता, “हा आमचा फ्लॅट आहे, आम्ही इथेच राहणार, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही बघून घेऊ,” अशा शब्दांत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर कर्ज वसुली अधिकारी उदय घाडगे यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 329(3), 329(4), 351(2) आणि 3(5) अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अरुण बाबुराव पाटणकर (तपासी अधिकारी)करीत आहेत.
उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था ही सभासद व ठेवीदारांच्या विश्वासावर कार्यरत असलेली आर्थिक संस्था असून, कर्जवाटपापासून ते थकीत कर्जाच्या वसुलीपर्यंत प्रत्येक बाबतीत कायदेशीर व नियमानुसार प्रक्रिया राबविण्यास संस्थेचे प्राधान्य आहे. सदर प्रकरणातही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील संबंधित तरतुदींनुसार तसेच कलम १०१ अंतर्गत वसुलीची कार्यवाही करून कलम १५६ व नियम १०७ अन्वये मिळकतीच्या ताब्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ताब्यात घेतलेल्या संबंधित मालमत्तेबाबत संस्थेने केलेली कार्यवाही ही विहित कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आली असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थेच्या कायदेशीर ताब्यातील मालमत्तेचे सील अथवा कुलूप तोडणे, वसुली प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे किंवा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावणे यासारख्या प्रकारांची संस्था गंभीर दखल घेईल. संस्थेचे अधिकारी व कर्मचारी कायद्याच्या चौकटीत आपले कर्तव्य बजावत असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.




