आंबेनळी घाटातून एसटीची वाहतूक आजपासून पूर्ववत; प्रवाशांना मोठा दिलासा!
स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न अन् न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज ‘इम्पॅक्ट’
महाबळेश्वर(राजेश सोंडकर )-पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि दळणवळणाचा मुख्य दुवा असलेल्या आंबेनळी घाटातून अखेर आजपासून एसटी बस वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत झाल्याने महाबळेश्वर, पोलादपूर आणि घाट परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाचा जोर ओसरूनही बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
यंदाच्या पावसाळ्यात आंबेनळी घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. घाटातील भौगोलिक परिस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मागील काही दिवसांत पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आणि परिस्थिती पूर्वपदावर आली, तरीही एसटी वाहतूक तातडीने सुरू करण्यात आलेली नव्हती. सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य आधार असलेली एसटी सेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती.
’मायभवानी संस्था’ व शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा आग्रही पाठपुरावा
या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत ‘मायभवानी संस्था प्रतापगङचे अध्यक्ष तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महाबळेश्वर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रायगड आणि सातारा दोन्ही जिल्हा प्रशासनाकडे पोलादपूर-महाबळेश्वर बससेवा तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.
’सातारा न्यूज मीडिया सेव्हन’च्या बातमीचा दणकेबाज इम्पॅक्ट
घाटातील बंद असलेली एसटी वाहतूक आणि प्रवाशांचे होणारे हाल यावर ‘सातारा न्यूज मीडिया सेव्हन’ या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलने सडेतोड आणि सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने आणि एसटी महामंडळाने अत्यंत गंभीर दखल घेतली. या बातमीच्या इम्पॅक्ट’मुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीमुळे प्रशासकीय पातळीवर वेगाने सूत्रे हलली.
तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश
घाटातील सुरक्षेची पाहणी करून आणि दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाशी समन्वय साधून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या यशस्वी मध्यस्थी व प्रयत्नांमुळे आंबेनळी घाटातून एसटी बस वाहतूक आजपासून पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
आज सकाळपासूनच पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर लालपरी धावू लागल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा, तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न आणि ‘सातारा न्यूज मीडिया सेव्हन’च्या निर्भीड बातमीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.




