यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
सातारा : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित या संकल्पनेतून महिलांमध्ये, विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये स्वयंरक्षणाची भावना, आत्मविश्वास आणि संकटाच्या प्रसंगी प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विपुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे स्वयंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. इंजिनिअरिंग, कॉमर्स, फार्मसी आदी विविध शाखांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.
या कार्यक्रमासाठी भारतातील पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर म्हणून परिचित असलेल्या शैला टीके कुलकर्णी यांना विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. शैला टीके कुलकर्णी व त्यांच्या टीमने विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थिनींकडूनही विविध तंत्रांची प्रात्यक्षिके करून घेत त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव देण्यात आला.
स्वयंरक्षण म्हणजे केवळ शारीरिक ताकद नव्हे, तर प्रसंगावधान, मानसिक ताकद, बौद्धिक सजगता, आत्मविश्वास आणि संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता परिस्थितीचे भान ठेवणे, स्वतःचा बचाव करणे आणि गरज पडल्यास प्रतिकार करण्यासाठी आवश्यक तंत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर अनेक विद्यार्थिनींनी शैला टीके कुलकर्णी यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी तसेच त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी केली. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आत्मविश्वास उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
‘मी स्वतःचे संरक्षण करू शकते’ हा आत्मविश्वास विद्यार्थिनींच्या मनात निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे त्यांच्या सहभागातून दिसून आले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी प्रा.डॉ. दशरथ सगरे, विक्रम पाटील, गणेश सुरवसे, विपुल पाटील, शैला टीके कुलकर्णी आणि संजय शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित राहते आणि कुटुंब सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहतो, या विचारातून राबविण्यात आलेला ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ हा उपक्रम महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आणि अनुकरणीय पाऊल ठरला आहे.



