कोयना धरण १०० टक्के भरले; सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, कोयना धरण १०० टक्के भरले आहे. दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजता धरणातील पाणीसाठा १०५ टीएमसी इतका झाला आहे.
पाणलोट क्षेत्रातून सुरू असलेला पाण्याचा येवा पाहता धरणाच्या सांडव्यावरून कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठावरील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच नदीपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावातील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
— कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर



