महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल: मिशन वात्सल्य योजना
सातारा -राज्यातील विधवा व परित्यक्ता महिलांना वारस प्रमाणपत्र मिळवून देणे, मालमत्तेचे हक्क मिळवून देणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मिशन वात्सल्य’ हा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी केवळ तात्पुरती मदत न करता, त्यांच्यासाठी भविष्यात ठोस कार्यक्रम राबवण्याच्या उद्देशाने या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. या योजने विषयी…….
मिशन वात्सल्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील विधवा आणि एकल महिलांना शासनाच्या विविध २४ योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. प्रशासनाने कंबर कसली आहे. या योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटील हे वारंवार बैठका घेऊन योजनेची प्रभावी अंमबजावणी करण्याचे निर्देशही दिले आहे.
मिशन वात्सल्य योजनेंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका,वारस प्रमाणपत्र, एलआयसी किंवा इतर विमा, नवीन बँक खाते उघडून देणे, नवीन आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावण बाळ , बाल संगोपन योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फी शिक्षण, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, शुभ मंगल सामुहिक योजना, अंत्योदय योजना,आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना अशा एकूण 24 याजनांचा लाभ मिशन वात्सल्य योजनांचा विधवा व परित्यक्ता महिलांना देण्यात येणार आहे.
योनजेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावपातळीवरील व शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, बचतगट समुह संघटक यांचा समावेश करण्यात आलेला आहे सदर ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय पथक गाव व शहर पातळीवर अनाथ झालेल्या बालकांच्या तसेच एकल/विधवा महिलांचे सर्वेक्षण करुन ज्या महिलांना एकुण 24 शासकीय योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नसेल त्यांची यादी तयार करतील व तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तालुकास्तरीय समन्वय समितीस सादर करतील तद्नंतर योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसलेल्या अनाथ बालक तसेच एकल, विधवा महिलांना लाभ मिळवून देणेसाठी संबंधित पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्रांची पुर्तता व अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. 24 शासकीय योजनेचा लाभ मिळाला नसलेल्या अनाथ बालक तसेच एकल, विधवा महिलांचे परिपूर्ण प्रस्ताव गाव पातळीवर गठीत केलेल्या पथकाकडून प्राप्त करुन घेऊन अशा विधवा, एकल महिला तसेच अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील विधवा आणि एकल महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘मिशन वात्सल्य’ योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. सातारा जिल्ह्यातील पात्र महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तातडीने संबंधित अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
समाजात सन्मानाने जगण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मिशन वात्सल्य योजनेने मदतीचा हात पुढे केला आहे. सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांपासून ते शहरात राहणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. केवळ शासकीय लाभांवर अवलंबून न राहता, या माध्यमातून मिळणारे शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्य यांचा वापर करून स्वतःची आणि आपल्या मुलांची प्रगती साधणे हेच या मिशनचे खरे यश असेल.
– वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा




