महाबळेश्वर नगरपरिषदेचा १६९ कोटींचा ‘शिलकी’ अर्थसंकल्प मंजूर; पर्यटनासह पायाभूत सुविधांवर विशेष भर.
महाबळेश्वर: जागतिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सुमारे १६९.७३ कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटन वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला असून, विशेष म्हणजे यात कोणतीही नवीन करवाढ सुचवण्यात आलेली नाही.
अर्थसंकल्पीय गोळाबेरीज
नगरपरिषदेने मांडलेल्या या अंदाजपत्रकात एकूण १,६९,७३,५६,६८७/- (१६९.७३ कोटी) रुपये जमा अपेक्षित धरली असून, १,६९,६४,५०,०००/- (१६९.६४ कोटी) रुपये खर्चाची तरतूद केली आहे. यानुसार, हा अर्थसंकल्प ९,०६,६८७/- रुपयांच्या शिल्लकीचा आहे.
अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि विकासकामे:
नगरपरिषदेने आगामी वर्षात खालील महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे:
पर्यटन विकास व सुशोभीकरण:महाबळेश्वरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचा कायापालट करणे आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारण्यासाठी विशेष निधीची तरतूद.
पायाभूत सुविधा: शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटारांच्या दुरुस्तीसाठी भांडवली खर्चातून मोठी तरतूद.
पर्यावरण व ‘माझी वसुंधरा’:’प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर’ मोहिमेला गती देणे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व जतन मोहीम राबवली जाणार आहे.
शुद्ध पाणीपुरवठा:वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन जलवाहिन्यांचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या थकबाकीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
उत्पन्न वाढीसाठी ठोस पावले
अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान महसुली तूट भरून काढण्यावर सदस्यांनी भर दिला. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे.
१)शहरातील सर्व नवीन मिळकतींची कर आकारणी करणे.
२)मिळकत कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवणे.
३)अनावश्यक खर्चात कपात करून आर्थिक शिस्त लावणे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका:
सभेत शिक्षण समिती सभापती श्री. रोहित ढेबे यांनी उत्पन्न वाढीचा प्रस्ताव मांडला, ज्याला स्वच्छता समिती सभापती श्री. संजय बाळकृष्ण जंगम यांनी अनुमोदन दिले. विरोधी पक्षनेते श्री. कुमार शिंदे यांनी महसुली तूट भरून काढण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
“महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेकडील उत्पन्न वाढीबरोबरच खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त ठेवणे हा प्रशासनाचा प्रधान्यक्रम राहील.”
— योगेश पाटील, मुख्याधिकारी
“हा अर्थसंकल्प शहराला विकासाकडे नेणारा असून, सामान्यांवर कोणताही कराचा बोजा न टाकता शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
— सुनिल शिंदे, नगराध्यक्ष, महाबळेश्वर
या विशेष सभेला नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या अर्थसंकल्पामुळे महाबळेश्वरच्या पर्यटन वैभवात भर पडेल, अशी आशा व्यक्त होत आहे.




