वेळे येथील रास्त भाव धान्य दुकानास डॉ. संजीव कुमार यांची भेट
वाई (संजीव वरे )- वाई ग्रामपंचायत वेळे ता. वाई संचलित रास्त भाव धान्य दुकानास मा. डॉ. श्री. संजीव कुमार, सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग तथा पालक सचिव, सातारा तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने यांनी दफ्तर तपासणीच्या अनुषंगाने भेट दिली.
यावेळी वाई तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. समीर मिर्झा, वाई तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री. ओंकार सनातन, श्री. दत्तात्रय माने (गोदाम पुरवठा लिपिक), श्री. रोहित गिरी गोसावी (पुरवठा लिपिक) तसेच रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल मांढरे, उपाध्यक्ष श्री. गेणबा जायगुडे आणि वेळे रेशन वितरक श्री. प्रशांत शिंदे उपस्थित होते.
या प्रसंगी ग्रामपंचायत वेळेच्या सरपंच सौ. अर्चना राजेंद्र गायकवाड व उपसरपंच सौ. सिंधू अर्जुन ढमाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांनी रास्त भाव धान्य दुकानातील दफ्तर, वितरण व्यवस्था व संबंधित नोंदींची पाहणी करून आवश्यक माहिती घेतली.
त्यानंतर मान्यवरांनी ग्रामपंचायत वेळे कार्यालयास भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची तसेच ग्रामपंचायतीच्या जबाबदार, पारदर्शक व लोकाभिमुख कार्यपद्धतीची माहिती ग्रामसेविका श्रीमती श्रुतिका जाधव यांनी मान्यवरांना दिली.यावेळी तलाठी सौ. शुभदा महानवर, दक्षता समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





