महिलांनी शेतीसोबत इतर उद्योगात उतरावे :ॲड. सुश्मिता धुमाळ
आसनगाव येथे कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटाचा सत्कार
पिंपोडे बुद्रुक, ता. १० : ‘‘महिलांनी घराच्या बाहेर पडून नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगधंद्यात उतरल्या त्यांचीच प्रगती झाली आहे. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ झाली आहे, तसेच त्यांच्या राहणीमानातही बदल झाले आहेत. शेतकरी कुटुंबातील महिलांनी शेतीसोबत इतर उद्योगात प्रवेश करावा. आपण हे वैश्विक सत्य जेवढ्या लवकर ओळखू, त्या अनुषंगाने कृती करू तेवढ्या लवकर आपल्या शेतीची, कुटुंबाची, पर्यायाने समाज व देशाची प्रगती होईल,’’ असे प्रतिपादन मिस इंडिया २०२३ ॲड. सुश्मिता धुमाळ यांनी केले.
आसनगाव (ता. कोरेगाव) येथील कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटाने पानी फाउंडेशनच्या फार्मर कप २०२३ स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे उपस्थित होत्या. यावेळी ॲड. प्रियांका पाटील, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले, सरपंच हेमलता शिंदे, उपसरपंच किशोर शिंदे, विकास सोसायटीचे अध्यक्ष विलास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणपत शिंदे, साधना यादव, ग्रामसेवक गणपतराव खलाटे, कृषी सहायक अजितकुमार गेजगे उपस्थित होत्या.
फरांदे म्हणाल्या, पूर्वी भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान होती. बदलत्या भवतालात गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या. मात्र, त्याप्रमाणात शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. या शेतकरी कुटुंबांना संकटाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची क्षमता उद्योग व सेवा क्षेत्रात आहे. शेतकरी कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी कामाची विभागणी करून एकाने शेती आणि दुसऱ्याने पिकविलेल्या मालावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास शेती फायद्याची होऊ शकते
हेमलता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जागृती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सैनिक प्रदीप शिंदे यांनी आभार मानले. प्राजक्ता शिंदे, कीर्ती काटे, तृप्ती भोसले, जागृती शिंदे, ग्रामपंचायत व विकास सेवा सोयायटीच्या वतीने शेतकरी गटातील महिलांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जगदीश शिंदे, प्रशांत शिंदे, माजी सैनिक कृष्णात शिंदे, सूर्यकांत शिंदे, रामदास शिंदे, विक्रम शिंदे, बाबूराव शिंदे, दत्तात्रय शिंदे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
