विनोद कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ नितीन देशपांडे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
सातारा – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी मसापचे कोषाध्यक्ष विनोद सुर्यनारायण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा शहराला या पदावर काम करण्याचा सन्मान पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यानिमित कुलकर्णी यांचा सत्कार ‘आम्ही पुस्तकप्रेमी समूह’ आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पत संस्थेतर्फे शुक्रवार, दि. १८ रोजी सायंकाळी ६ वाजता कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी,साहित्यिक मा नितीन देशपांडे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
कुलकर्णी हे गेल्या 13 वर्षांपासून मसापच्या माध्यमातून काम करत आहेत.कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या नामशेष होणा-या घराची उभारणी करुन त्याचे स्मारकात रुपांतर करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सलग ८ वर्षे पाठपुरावा त्यांनी केला आहे. ‘छोट्या बँकेची मोठी गोष्ट’ या प्रसिध्द पुस्तकाचे ते लेखक आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यानिमित्ताने केला जाणार आहे
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे अशी विनंती डॉ संदीप श्रोत्री,श्रीराम नानल,शिरीष चिटणीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
हा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल,शनिवार पेठ-सातारा येथे संपन्न होणार आहे.