विनोद कुलकर्णी हे साताऱ्याचे, पुणे तसेच महाराष्ट्रात साहित्यिक नेतृत्व करणारे नम्र आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व-नितीन देशपांडे
कुपर उद्योग समूहाचे मनुष्यबळ संसाधनाचे महाव्यवस्थापक आणि साहित्यप्रेमी श्री नितीन देशपांडे यांनी विनोद कुलकर्णी यांचा गौरव करताना त्यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करीत साताऱ्याचे हे साहित्यिक नेतृत्व पुणे तसेच महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने साताऱ्याचे नाव उज्वल करीत असल्याचे प्रतिपादन केले.विनोद कुलकर्णी यांच्या कार्यकर्तुत्वामुळे सातारा आणि सातारा जिल्यातील साहित्यिक,कवी,विचारवंत यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसेच विविध साहित्यिक उपक्रमात आपला साहित्यिक ठसा उमटिवण्यासाठी मदत आणि प्रेरणा मिळते असे सांगितले.महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावरची त्यांची नियुक्ती सातारा शहर तसेच जिल्यातील साहित्यिक उपक्रमांना उभारी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या बरोबरच्या अनेक उपक्रमांमधील आठवणींचा त्यांनी उजाळा दिला. विशेषत: मराठीतील क्रांतीकारक कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या मर्ढे या गावी शासन उभे करीत असलेल्या स्मारकामध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी कूपर उद्योग समूहाने केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री राहिलेले तसेच सातारचे नगराध्यक्ष राहिलेले धनजीशाह कूपर यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला आणि त्यांचे चरित्र साहित्य संस्कृती महामंडळामार्फत लोकांसमोर यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कूपर उद्योग समूहातर्फे त्यांच्या कामगारांसाठी वाचनालय चालवले जाते आणि त्यांच्यासाठी पुस्तक प्रदर्शनी ही भरवली जातात असे त्यांनी अभिमानपूर्वक सांगितले.
वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी झटणारे विनोद कुलकर्णी यांनीभविष्यात वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी आणि साहित्य चळवळ अधिक बळकट करण्यासाठी मी अग्रक्रम देणार असे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याने दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि सातारकर नागरिकांतर्फे विनोद कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री विनोद कुलकर्णी बोलत होते.हा सत्कार कूपर उद्योगाच्या मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक श्री नितीन देशपांडे यांचे शुभहस्ते झाला.
श्री विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या साहित्य सेवेचा आढावा घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने साताऱ्यातून एक लाख पत्रे माननीय पंतप्रधानांना पाठवण्यात आली. त्या चळवळीतला हा एक टप्पा. त्याचा निर्णय झाला. यासाठी अनोख्या नियोजनाने त्यांनी दिल्लीमध्ये जाऊनही आंदोलन केले. या सर्व गोष्टी सातारकरांसमोर उघड करताना ते भाऊक झाले होते. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या सर्व घटना त्यांनी सातारकरांसमोर उघड्या केल्या. भविष्यात सातारकर यांच्या आशीर्वादाने साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आपल्या मनोगतात त्यांनी कवी मर्ढेकर यांचे घर स्मारक म्हणून कसे रूपांतरित केले हाही घटनाक्रम विशद केला. हे सर्व सांगत असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी सर्व सहकार्यांना धन्यवाद दिले. या सर्व कामासाठी मी कधीही थांबणार नाही हा त्यांचा दृढनिश्चय त्यांची भविष्यकालीन वाटचाल दाखवणारा होता.
या समारंभासाठी विशेष पुढाकार घेणारे दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री शिरीष चिटणीस यांनी आपल्या प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन करताना त्यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांनी केलेली निर्णायक कृती ही उलगडून दाखवली.
पर्यावरण आणि साहित्यप्रेमी डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी कुलकर्णी हे सदस्य पदी नियुक्त झाल्याने सातारच्या साहित्य चळवळीला मोठे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि सातारकर विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक होणे या दोन्ही घटना शुभ सूचक असल्याने त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीला होईल असे सांगितले. त्यांनी कुलकर्णी यांना अशी विनंती केली की साताऱ्यातील अप्रकाशित साहित्यिकांची पुस्तके लोकांसमोर येण्यासाठी कुलकर्णी आणि प्रयत्न करावा.
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी आपल्या मनोगतात श्री विनोद कुलकर्णी यांनी जनता सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढताना जे परिश्रम घेतले त्याचा विस्तार पूर्वक आढावा घेतला. श्री विनोद कुलकर्णी व सहकार भारती चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोसले यांनी साताऱ्यामध्ये सहकार चळवळ बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आम्ही पुस्तक प्रेमी या समूहाने साताऱ्याची ही साहित्य चळवळ आरंभली आहे त्याचे नितीन देशपांडे यांनी कौतुक केले. विशेषतः शिरीष चिटणीस, डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नानल आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ श्याम बडवे यांनी केले.या कार्यक्रमासाठी संध्या चौगुले,डॉ सारिका देशपांडे,पद्माकर पाठकजी,डॉ.रविंद्र भोसले,डॉ कांत फडतरे, हेमंत कासार,अनंत जोशी,वजीर नदाफ,विनायक भोसले आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल जठार तसेच जनता बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उमेश साठे तसेच जनता बँकेचा स्टाफही या सोहळ्यास उपस्थीत होता.या सत्कार सोहळ्यास सातारकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.