छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागचं ‘हे’ आहे कारण; समितीच्या अहवालात धक्कादायक खुलासा
छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक कारण समोर
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. यावरुन राज्यात एकच संतापाची लाट उसळली होती. राजकीय गोटात तर आरोप प्रत्यारोपही झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता 16 पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकोट येथील महाराजांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंग कामामुळे कोसळला. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असा धक्कादायक खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने राज्या सरकारकडे १६ पानी अहवाल सादर केला आहे.
पुतळा उभारण्यात आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नसल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. परिणामी पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता ज्यामुळे पुतळा कमकुवत झाला आणि कोसळला.दरम्यान, राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.