डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी-मा.आ.पृथ्वीराज चव्हाण
डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे अत्यंत जवळून काम केले होते. डॉ मनमोहन सिंह हे अत्यंत उच्चशिक्षित होते तसेच तें अर्थतज्ज्ञ होते. पण याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. तें राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते परंतु तें राजकारणी नव्हते असं म्हटले जाते कारण तें परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड अशी नम्रता होती हे मी अगदी जवळून पाहिले आहे.
2008 च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहन सिंह यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची देशाला झळ बसू दिली नाही.त्यांनी अनेक महत्वाचे कायदे केले मनरेगा सारखा कामाच्या अधिकाराचा कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा,शिक्षणाचा हक्काचा कायदा (Right to Education), वनधिकार कायदा असे अनेक लोकांभिमुख कायदे डॉ. मनमोहन सिंह यांच्या कालखंडात त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळ मधील तो 10 वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल. अशा महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली
– पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
पंतप्रधान कार्यालय राज्य मंत्री, भारत सरकार