विकासाच्या सम्यक वाटांचा शोध घेण्याची प्रक्रिया न संपणारी -ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी
विकासाच्या सम्यक वाटांचा मी गेली अनेक वर्षे अविरत शोध घेत आहे आणि त्या शोध प्रक्रियेत गांधीजी, शुमाकर, दीनदयाळजी, कापरा आणि हे जेल हे माझे गुरु आहेत. असे विनम्र उद्गार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी काढले. सातारच्या सुजाण श्रोत्यांसमोर आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कुलकर्णी यांच्या ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे ‘ या पुस्तकावरील चर्चेत भाग घेताना काढले. आम्ही पुस्तक प्रेमी समूहाने ‘लेखक आपल्या दारी’ या कल्पक कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक आणि जगण्याची वेगळी वाट जाणीवपूर्वक चोखाळणारे दिलीप कुलकर्णी यांना निमंत्रित केले होते.
प्रारंभी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि साहित्यप्रेमी शिरीषचिटणीस यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात लेखक आपल्या द्वारी या उपक्रमाच्या पहिल्याच कार्यक्रमात दिलीप कुलकर्णी सारखा एक साधा आणि मनमोकळा पण स्पष्ट वक्ता अशी व्यक्ती आल्याने आनंद व्यक्त केला. त्या काळात इंजिनीयर झाल्यावर टेल्को सारखी आयुष्यात स्थिरता आणणारी नोकरी सोडून कोकणात निसर्ग शैलीने राहण्यासाठी त्यांनी व पत्नी पोर्णिमा यांनी पुणे सोडले आणि दापोली तालुक्यातील कुडावळे येथे राहावयास गेले ही एक क्रांतिकारी घटना असल्याचे चिटणीस म्हणाले.
निसर्गप्रेमी डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी कुलकर्णी यांचा परिचय उपस्थित श्रोत्यांना करून दिला. कृती शिवाय वाचनाला आणि लेखनाला काहीच अर्थ नाही हे दिलीप कुलकर्णी यांनी जाणले आणि त्याप्रमाणे आचरण केले.
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी ‘ वेगळ्या विकासाचे वाटाडे’ या पुस्तकाची माहिती देताना दिलीप कुलकर्णी यांनी शाश्वत विकासाबाबत घेतलेल्या भूमिकेचा उहापोह केला.
या पुस्तकाच्या मांडणीत दिलीप कुलकर्णी यांनी विसाव्या शतकात जरी विकास झाला असला तरी अनेक अनुत्तरीत समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. केवळ जीडीपी वृद्धी हा विकासाचा निकष होऊ शकत नाही या गोष्टीकडे नानल यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले. नवीन पिढ्यांना नवीन समस्यांना तोंड द्यावे द्यावे लागत आहे आणि अतिरेकी उपभोगाच्या लालसेने समाधान मिळत नाही हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. दिलीप कुलकर्णी यांची सुबुद्ध सातारकारांशी चर्चा ही चळवळीला बळ देईल असा विश्वास नानल यांनी व्यक्त केला.
हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण, सम्यक विकास या चाकोरी बाहेरच्या पुस्तकांचे लेखक दिलीप कुलकर्णी यांनी आपले विवेचन केवळ ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ या पुस्तका पुरते मर्यादित न ठेवता एकूणच विकासनीतीबद्दल भूमिका मांडली. उपभोगाला सीमा असली पाहिजे आणि आपले पारंपारिक उत्सव हे साजरे करताना सुद्धा भान राखले पाहिजे असे कळकळीचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
एवढा विकास होऊन सुद्धा वास्तवात पहावे तर तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे सुख जवा पाडे आणि दुःख मात्र पर्वत आहे एवढे अशी स्थिती दिसते आणि मोठ्या संख्येने लोक विपणनावस्थेत दिसतात. हे विदारक वास्तव त्यांनी श्रोत्यांच्या नजरेला आणून दिले. जीवनाच्या सर्व स्तरावर समस्या आहेत. त्याचे स्वरूप बदलत आहे. वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सामाजिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर असंख्य समस्या निर्माण झालेल्या दिसतात. आरोग्याच्या तर गुंतागुंतीच्या समस्या आहेत. यासाठी आनंद आणि समाधान देणारी जीवनशैलीच अंगीकारली तर आयुष्याचा पट सकारात्मक होईल. असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. जीडीपी वृद्धीतला फोलपणा त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. हिंदू धर्म आणि पर्यावरण यातील नाते स्पष्ट करताना सध्या ते दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. साताऱ्यात अशा चर्चेसाठी लोक एकत्र येत आहेत आणि कृती कार्यक्रम ठरवावा असे त्यांच्या देहबोलीत दिसत आहे याबद्दल त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. साताऱ्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी एक दिवसाची निशुल्क कार्यशाळा घ्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या समूहातून विविध विषयांच्या पुस्तक परिचयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख होणे भाग पाडले.
सातारकरांच्या मनोभूमीकेला एक वेगळी दिशा देणाऱ्या या अनौपचारीक चर्चात्मक कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर अंजली मनेरिकर यांनी केले.
श्रोते एक नवीन विचाराची दिशा घेऊन घरी परतले. त्यांचा निश्चय होता की उपभोगाला मर्यादा ठेवावी आणि परिसराचे रक्षण करावे.
या कार्यक्रमाला पर्यावरण तज्ज्ञ संध्या चौगुले, अदिती काळमेख,डॉ स्वाती श्रोत्री, ऐश्वर्या भोसले,जयंत देशपांडे,पद्माकर पाठकजी आणि इतर निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
