साताऱ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार – अशोकराव गायकवाड
मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा
वाई प्रतिनिधी –डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील ऐतिहासिक निवासस्थानावर भव्य व दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आज मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री मा. संजय सिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण मंत्री मा. दादा भुसे, तसेच मा. अरुण गाडे (पुणे) यांच्या उपस्थितीत नियोजनावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशी माहिती आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष- अशोक बापू गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यांच्यासोबत अरुण पवार, संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत काष्ट्राईब महासंघ तसेच रिपाईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये काष्ट्राईब महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अजित वाघमारे (सातारा), संघटक सचिव यशवंत माटे, विभागीय अध्यक्ष विनोद बनसोड, आरोग्य विभाग अध्यक्ष राजकुमार रामटेके, रिपाई वि. सेना जिल्हाध्यक्ष-वैभव गायकवाड, आमने बंगल्याचे मालक उदय आमने आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश होता.
बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील निवासस्थानाला ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण स्थान असल्याने त्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर विचारविनिमय झाला. स्मारकाच्या उभारणीसाठी शासनाच्या वतीने ठोस पावले उचलली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्री उदय आमने यांनी त्यांना होत असणाऱ्या अडचणी मंत्री महोदय यांच्या समोर मांडल्या व यातून योग्य मार्ग काढत आमचे योग्य ते पुनर्वसन करावे अशी भावनिक साद घातली.
ही बैठक यशस्वीपणे संपन्न होऊन साताऱ्यात लवकरच बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक उभे राहण्यासाठीचा मार्ग सोपा झाला असल्याची भावना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात शासन योग्य त्या उपाययोजना राबवून भारतीय संविधान निर्मात्यांच्या राष्ट्रीय स्मारकाला तातडीने मंजुरी देत याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करेल ही अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
