Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य सांस्कृतिक संचित आहे – डॉ. सुनीलकुमार लवटे   

साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य सांस्कृतिक संचित आहे – डॉ. सुनीलकुमार लवटे   

साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य सांस्कृतिक संचित आहे – डॉ. सुनीलकुमार लवटे   

साने गुरुजींच्या साहित्याचे आपण पुनर्जीवन करूया डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या आवाहन

सातारा ( प्रतिनिधी ):- साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य सांस्कृतिक संचित आहे. त्यांच्या साहित्याचे आपण पुनर्जीवन करूया, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

 येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ( थोरले) नगर वाचनालय तसेच दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या त्रिदिवसीय व्याख्यानमाला येथील पाठक सभागृह, नगर वाचनालय येथे संपन्न झाली. या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्य या विषयावर ते बोलत होते. यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ.अशोक भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने, श्रीराम नानल आदी उपस्थित होते. 

डॉ.सुनील कुमार लवटे पुढे म्हणाले, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे व्यवसायाने शिक्षक होते. योगायोगाने त्यांचे साहित्य संपादन करण्याचा योग माझ्या जीवनात आला. समृद्ध शिक्षण किशोरवयामध्ये मिळाले तर माणसाची जडणघडण कशी होते हे माझ्या माध्यमातून तुम्हाला समजेल. तरुण वयात समग्र वाचायला मिळाले तर तुमची जडणघडण होते. साने गुरुजींनी 135 ग्रंथ लिहिले त्यातील प्रकाशित फक्त 80 आहेत. साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीचा विकास केलेला आहे. जात, धर्म, प्रांत या कारणामुळे भारत एकात्म होत नाही. साने गुरुजींची पत्रकारिता अजून महाराष्ट्राला माहीत नाही. साने गुरुजींनी पत्रकारिता हा व्यवसाय सतीचे वाण म्हणून स्वीकारला. साने गुरुजींनी 2027 ते 2029 या काळात पाच पानाचे दैनिक हाताने लिहायचे. हे पाचशे अंक स्व हस्ताक्षरात तसेच त्यामध्ये एकही खाडाखोड नाही. 15 ऑगस्ट 1948 साली सुरू झालेला साधना साप्ताहिकाचा प्रवास आजही सुरू आहे. साने गुरुजींनी पत्रकारितेतून जसे प्रबोधन केले तसेच ते त्यांनी साप्ताहिक मासीके यामधूनही केले. ते उदारमतवादी लेखक होते. जग बदलायची ताकद साने गुरुजींच्या मध्ये होती. विनोबांच्या लेखांमध्ये जी प्रज्ञा आहे तीच प्रज्ञा तुम्हाला साने गुरुजींच्या लेखांमध्ये दिसते. ‘ आदर्श शाळेचे माझे स्वप्न ‘ हा साने गुरुजींनी लिहिलेला निबंध अप्रकाशित आहे. हा निबंध महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करून सर्व शाळांना, शिक्षकांना दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. साने गुरुजींची शब्दकळा इतर कुठल्याही लेखनामध्ये मिळणार नाही.

डॉ.अशोक भोईटे म्हणाले, ज्या व्यक्तीच्या पुढेही व मागेही कोणीही नाही अशा व्यक्तीचा आपण सत्कार करतोय ही कौतुकास्पद बाब आहे. लवटे सरांचा प्रवास खडतर आहे. लहानपणापासून ते आश्रम शाळेत राहिले. मोठमोठ्या साहित्यिकांशी सरांचा संपर्क आला. त्यानंतर त्यांनी साहित्यात मोठे काम केले. एवढ्या मोठ्या व्यक्तीचा सन्मान माझ्या हातून होतोय त्याबद्दल मी भारावून गेलो आहे.

किशोर बेडकीहाळ म्हणाले, लवटे सरांना साने गुरुजींच्या करुनेचा व कृतिशील समर्पणाचा स्पर्श झालेला आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी जी पायपीट केली त्याचे स्मरण आज मला लवटे सरांच्या निमित्ताने होत आहे. ज्ञानकोशकार व राजवाडे त्यांच्यामध्ये लपलेला आहे. संयत वाणिने स्पष्ट बोलण्याने प्रश्न सुटतात हे लवटे सरांकडून मला जाणवते. प्रज्ञा, करुणा व समर्पण ही तीन मूल्ये त्यांच्यामध्ये एकवटलेली आहेत. साने गुरुजींची अप्रकाशित माहिती जेव्हा येईल तेव्हा महाराष्ट्रासमोर नवे दालन निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिरीष चिटणीस म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य लवटे सरांनी हिंदीमध्ये रूपांतरीत करून ते साहित्य संपूर्ण भारतातील लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी त्यांनी डॉ. सुनील कुमार लवटे यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्राचे वाचन केले.

विनोद कुलकर्णी म्हणाले, लवटे सरांचे काम अफाट व अचाट असे आहे. त्यांच्या कामाने मी प्रभावित झालेलो आहे. लवटे सर साहित्य क्षेत्रातील वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांना मिळावे अशी माझी इच्छा असून त्यांना योग्य तो न्याय देण्याची माझी भूमिका राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

   डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या वतीने कविता रसग्रहण, चित्रपट रसग्रहण, वेगवेगळी व्याख्याने आयोजित करणे, नाट्य रसग्रहण चर्चा, दिवाळी अंकांचा परिचय इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. पुस्तकप्रेमी समूहाचे कार्य व मूळ उद्देश इतरांना समजावा हा हेतू त्यामागे आहे. वाचन चळवळीला, लेखन चळवळीला आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. डॉ. सुनील कुमार लवटे हे वाचन चळवळीतले महामेरू आहेत. त्यांचे कार्य खूप मोठे आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप श्रोत्री यांनी केले. सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले. आभार श्रीराम नानल यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे

दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून?-सुषमा अंधारे कराड

Live Cricket