वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)पुणे बंगळूर महामार्गावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील वाहनांना झालेल्या अपघातात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. आठवले यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या. या अपघातात पोलीस वाहनांसह सात गाड्यां एकमेकांवर आदळून गाड्यांचे मोठे नुकसान झाले .मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.महाड येथील चवदार तळ्याच्या कार्यक्रमासाठी बुधवारी केंद्रीय मंत्री आठवले महाडला आले होते. महाड येथे मुक्काम करून ते आज सकाळी महाबळेश्वर येथे आले. येथून वाई येथे अशोक गायकवाड यांच्या घरी थांबून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. पुणे बंगळूर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत सायंकाळी खंबाटकी बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी भरधाव वेगातील वाहने एकमेकांवर आदळली. या यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांच्या ताफ्यात वाहनाच्या पुढे व मागे पोलीस गाडी होती. त्यांच्या ताफ्याच्या पुढील गाड्या एकमेकांवर आदळल्याने त्यांच्या ताफाही त्या गाड्यांवर जाऊन आदळला .रामदास आठवले यांची गाडी पुढील पोलीस वाहनावर जाऊन आदळली. त्यामुळे आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या अपघातात आठवले यांच्या पत्नी सीमा यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली. ही माहिती मिळताच सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष अशोक गायकवाड तात्काळ तेथे पोहोचले. त्यानंतर आठवले गायकवाड यांच्या गाडीने मुंबईकडे रवाना झाले. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
