कुसुंबी आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे कामाच्या चौकशीची साधू चिकणे यांची मागणी
मेढा- स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेत समाविष्ट असलेल्या कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत- बाह्य दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.मात्र संबंधित ठेकेदाराने येथील दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे केले असून संपूर्ण निधी पाण्यात गेलेला पाहायला मिळत आहे. संबंधित कामाची चौकशी व्हावी अशी मागणी साधू चिकणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा तात्काळ मिळाव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील अंतर्गत समस्या दूर व्हाव्यात या उद्दिष्टाने स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना लाखो रुपयांचा निधी गरजेनुसार मंजूर करण्यात आला आहे.
कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राला स्मार्ट आरोग्य केंद्रामध्ये समाविष्ट करून दुरुस्तीसाठी जवळपास ९२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.हे काम ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आले आहे. त्या ठेकेदाराने हे काम करीत असताना निकृष्ट दर्जाचे केले आहे.
आरोग्य केंद्रात बसवण्यात आलेली फरशी व्यवस्थित बसवली गेली नाही. तर आरोग्य केंद्राच्या स्लॅब गळतीमुळे पत्रा टाकण्यात आलेला होता तो खराब झाल्याने हा पत्रा बद्दलण्याबाबत प्रस्तावित होते,मात्र ठेकेदाराने काही ठिकाणी जुनाच पत्रा वापरला असून जो नवीन पत्रा टाकला आहे तोही रुंदीने कमी टाकला असल्याने आजही आरोग्य केंद्राच्या इमारतीमधून आत मध्ये पाणी येत आहे. त्यामुळे हा निधी संपूर्णपणे पाण्यात गेल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.
अंतर्गत दुरुस्ती मध्ये आरोग्य केंद्रात साहित्य ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कपाटे असावीत यासाठी आरोग्य केंद्रातील खोल्यामध्ये कपाटे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र ठेकेदाराची कमाल पैसे वाचवण्यासाठी कप्प्याविना कपाटे बनवण्यात आली आहेत. या कपाटांना कडापे न बसवल्याने कप्यावीना कपाटे बांधण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रातील काही खोल्यांमध्ये गरजेप्रमाणे दरवाजे बदलण्यात यावेत असे असताना देखील दरवाजे देखील बदलण्यात आलेले नाहीत.त्यामुळे नेमका आलेला निधी ठेकेदाराने कोठे खर्च केला हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
तरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्मार्ट कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची चौकशी करावी व ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी चिकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
