जनमाणसांत लक्ष्मणरावतात्यांचे स्थान आदराचे-प्रमोद शिंदे
सातारा -सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन लक्ष्मणरावतात्या पाटील यांनी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केंद्रबिंदु मानुन व त्यांच्या हिताचे काम केलेले होते. या कार्यवृत्तीमुळेच जनमाणसांत लक्ष्मणरावतात्यांनी आदराचे स्थान निर्माण केले, असल्याचे गौरवोदगार कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी काढले.
माजी खासदार लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त किसन वीर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, गावच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करून विविध सहकारी संस्था, दुधसंघ, जिल्हा बँक, साखर कारखाना ते सातारा जिल्हयाचे खासदार या पदांपर्यंत पदे भुषिविलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हयामध्ये ताकत वाढवुन कार्यकर्त्यांनी मोठी फळी निर्माण करण्यासाठी तात्यांनी विशेष प्रयत्न केले व त्यांच्या या यशामुळेच जिल्हयामध्ये आजही हे यश पहायला मिळत आहे. तात्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही विविध ठिकाणी योग्य त्या पदावर संधी देऊन काम करण्याची मुभा दिल्यामुळे आजही त्यांच्यापश्च्यात देखील कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत. तात्यांनी जी सर्वसामान्य जनतेविषयी असलेली तळमळ, प्रेम याचा वारसा नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील पुढे चालवित असल्याचा अभिमानही आम्हाला वाटत असल्याचे सांगितले. स्व. किसन वीर व स्व. लक्ष्मणराव पाटील यांनी दाखविलेल्या वाटेवरूनच किसन वीर साखर कारखान्याची वाटचाल सुरू असुन नामदार मकरंदआबा व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच या संस्थेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक बाबासाहेब कदम, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय कांबळे, हणमंत चवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, शामराव गायकवाड, मोहन चव्हाण, बबनराव साबळे, अजय कदम, मानसिंगराव साबळे, बाळासाहेब पाटील, सर्जेराव पवार, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
