भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर!
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानला दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी रोखण्याचा इशारा दिला आहे. अशातच पाकिस्तानमधील नद्यांना पूर आला आहे. यावरून पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी थेट भारतावर आरोप केला आहे की भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलं आहे की भारताने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता अचनाक झेलम नदीत पाणी सोडल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे.पाकिस्तानी माध्यमांनी केलेल्या दाव्यांनुसार भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुजफ्फराबाद व आसपासच्या भागातील पाण्याचा स्तर वाढला.
नद्यांमधील पाण्याची पातळी वाढून पूर आला आहे. काश्मीरमधील बारामुल्लाह जिल्ह्यातून पाणी पाकव्याप्त काश्मीर आणि पाठोपाठ मुजफ्फराबादमध्ये शिरलं.
भारत सरकारने शनिवारी सिंदू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी औपचारिक अधिसूचना जारी केली आहे आणि गुरुवारी ही अधिसूचना पाकिस्तानला सोपवली. या अधिसूचनेत म्हटलं आहे की “आम्ही सिंधू जलकरार स्थगित करत आहोत.” त्यामुळे सिंधू नदीतील पाण्याशी संबंधित वेगवेगळ्या विभागांच्या आयुक्तांमधील बैठका, उभय देशांमधील माहितीचं आदान-प्रदान व नवीन प्रकल्पांची आगाऊ सूचना यासह करारातील इतर जबाबदाऱ्या निलंबित करण्यात आल्या आहेत. हा करार स्थगित केल्यामुळे भारत आता पाकिस्तानच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्याशी सल्लामसलत न करता नदीवर धरणे बांधण्यास मोकळा आहे. तसेच भारत आपल्या नद्यांचं पाणी अडवू शकतो, धरणांमधील पाणी वाट्टेल तेव्हा नदीत पाणी सोडू शकतो.
