हिंदवीत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
सातारा: नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाहूपुरी येथील श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी नगरसेवक अक्षय जाधव यांनी शाळेला भेट देऊन नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर चक्क मिकी माऊस उभा होता. त्याच्याशी हस्तांदोलन करत शाळेत पहिले पाऊल ठेवले. रंगीबेरंगी सजावट, ढोल-ताशांचा गजर आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी म्हणाले, ‘‘शिक्षण ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभरणी आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. शाळांमध्ये आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.’’
या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ नवगतांचे स्वागतच झाले नाही, तर शिक्षणाविषयी पालकांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडल्याची भावना श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यिका शिल्पा पाटील व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.




