डॉ.मनोहर ससाणे ग्रँड मास्टर पुरस्काराने सन्मानित
गेली ४० वर्षे अविरत रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ मनोहर ससाणे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान निश्चितच वाखाणण्यासारखे आहे असे गौरवोउद्गार मंजुश्री हिलिंग्ज इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा सौ मंजुश्री लहासे यांनी काढले.
मंजुश्री हिलिंग्ज इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून डॉ ससाणे यांनी रेकीचा कोर्स पूर्ण करून त्यातील सर्वोच्च पद पटकावले. त्याबद्दल इन्स्टिट्यूट तर्फे डॉ मनोहर ससाणे यांना ग्रँड मास्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार आणि उद्योजक श्री राजेश लहासे होते.
शेगाव जि. बुलढाणा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पुढे बोलताना मंजुश्री मॅडम यांनी सांगितले की, डॉ ससाणे यांनी अलोपॅथिक, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असतानाच रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी हिलिंग्ज टेक्निकबाबत माहिती घेतली आणि त्यांनी हा कोर्स पूर्ण केला.
डॉ. ससाणे यांचे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक कार्य अतुलनीय आहे. विविध विषयांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान आत्मसात करावे हा त्यांचा आग्रह असतो. आत्तापर्यंत त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग, माईंड प्रोग्रामिंग, हॅपी थॉट्स असे विविध कोर्स पूर्ण केले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक, आरोग्य, व्यक्तिमत्त्व या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. कोरोना काळात त्यांनी स्वतःचा Happy Life By Dr Manohar Sasane हा यू-ट्यूब चॅनल काढून कोरोना तसेच इतर अनेक आजारांवर माहितीपूर्ण व्हिडीओ बनवून समाजाला मार्गदर्शन केले आहे. समाजात जागृती केली आहे. या पुरस्कारासाठी एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मिळाले याचा मला निश्चितच आनंद आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ ससाणे म्हणाले की मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मंजुश्री हिलिंग्ज इन्स्टिट्यूटचे मी आभार मानतो. विदर्भातील जळगाव-जामोद सारख्या एका छोट्या तालुक्यातून मंजुश्री मॅडमने या इन्स्टिट्यूटची सुरुवात करून हे हिलिंग्ज टेक्निक आज भारतातच नव्हे तर परदेशातही नेले आहे. मंजुश्री हिलिंग्ज इन्स्टिट्यूटचे साधक आज देश-विदेशातून या कोर्सचा फायदा घेत आहेत. मलाही यातून खूप काही शिकायला मिळाले.
या कोर्समधून शिकवले जाणारे प्रत्येक मेडिटेशन हे आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे. सर्वांनी ते नियमित करून त्याचा शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी फायदा करून घ्यायला हवा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आसावरी देशपांडे यांनी केले. तर आभार ज्ञानेश लहासे यांनी मानले.
