छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या प्रतापगडावरील भवानी मंदिराला ३६६ वर्षे पूर्ण, नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
महाबळेश्वर (वार्ताहर) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा आणि मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला यंदा पुन्हा एकदा शारदीय नवरात्र उत्सवाने उजळून निघणार आहे. महाराजांनी अफझलखानाचा पराभव केल्याच्या विजयाच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या आई भवानीच्या मंदिराला यंदा ३६६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सोमवार, २२ सप्टेंबर ते गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ या काळात प्रतापगडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे नियोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
उत्सवाचा तपशीलवार कार्यक्रम:
नवरात्र महोत्सवाच्या काळात, दररोज सकाळी आई भवानीला अभिषेक आणि महाआरती केली जाईल. तसेच, सायंकाळी पूजा, सनई-चौघड्याचे मंगलमय सूर आणि जागराचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या महाआरतीनंतर पारंपरिक गोंधळ, ढोल-लेझीम आणि ग्रामस्थांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
▪️२२ सप्टेंबर: उत्सवाची सुरुवात अभिषेक, ध्वजारोहण, घटस्थापना आणि महाआरती होणार आहे.
▪️२६ सप्टेंबर: या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येईल, तसेच ब्राह्मणवृंदाद्वारे सप्तशती पाठवाचन केले जाईल.
▪️२७ सप्टेंबर: किल्ले प्रतापगडावरील सर्वात आकर्षक असा मशाल उत्सव याच दिवशी होणार आहे.
▪️२८ सप्टेंबर: भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाईल. छत्रपती महोत्सवाचा विशेष कार्यक्रम आणि स्वराज्य ढोल-लेझीम पथकाचे सादरीकरण होणार आहे.
▪️१ ऑक्टोबर: खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विशेष शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
▪️२ ऑक्टोबर: महोत्सवाचा शेवट पालखी मिरवणूक, सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम, ढोल-लेझीमचा गजर, आतिषबाजी आणि सेवकांच्या सन्मान सोहळ्याने होईल.
या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आई भवानी मंदिर व्यवस्थापक, सेवकवर्ग आणि ग्रामस्थ मंडळींनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे.
