दुष्काळावर मात करण्यासाठी ‘निर्मल सीड्स’ च्या सीएसआर निधीतून सातारा जिल्ह्याला ६ टन चारा बियाणे उपलब्ध
सातारा दि.२६- यंदाच्या खरीप हंगामामध्ये एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आला असून संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधनासाठी मुबलक चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून निर्मल सीड्स पुणे या कंपनीच्या सीएसआर निधीतून सातारा जिल्ह्यासाठी हायब्रीड ज्वारी चारा बियाणे (मल्टीकट) चे एकूण ६ टन चारा बियाणे विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या बियाण्याद्वारे एकूण २४० हेक्टर क्षेत्रावर लागवड होऊन प्रति हेक्टरी ५० मे. टन प्रमाणे एकूण १२००० मे. टन हिरवा चारा उत्पादित होणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी या बियाण्यांचे तालुकानिहाय वाटप नियोजन केले असून, संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयांना बियाणे पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. फलटण व माण तालुका – प्रत्येकी १ टन, सातारा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटण, वाई, जावळी, व खंडाळा तालुका प्रत्येकी ०.५ टन या प्रमाणात तालुकानिहाय चारा बियाणे वाटप करण्यात येत आहे.
प्राप्त झालेल्या या चारा बियाण्यांचे वाटप ज्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना प्राधान्याने करण्यात येणार आहे. जेणेकरुन कमी कालावधीत जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादित होऊन जिल्ह्यातील पशुधनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. इच्छुक शेतकरी व शेतकरी गटांनी अधिक माहितीसाठी आणि बियाणे मागणीसाठी आपल्या संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.



