Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णतः ऑनलाइन

जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णतः ऑनलाइन

जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णतः ऑनलाइन

‘सीसीव्हीआयएस’ प्रणालीद्वारेच अर्ज स्वीकारणार; शक्यतो ६० दिवसांत पडताळणीचे उद्दिष्ट

मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज केवळ ‘सीसीव्हीआयएस’ प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

घरबसल्या अर्जापासून प्रमाणपत्रापर्यंत सुविधा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या या प्रणालीद्वारे अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती जाणून घेणे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेणे शक्य होणार आहे. डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे मिळणार असून, शंकानिरसनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध असेल. ऑनलाइन अपलोड केलेली कागदपत्रे समितीच्या कार्यालयात पुन्हा जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

६० दिवसांत पडताळणी

अर्ज आणि पुराव्यांची ऑनलाइन पडताळणी करून शक्यतो ६० दिवसांत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अर्जदाराला आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी दिली जाणार आहे. निर्णयाची माहिती एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तसेच सेवाविषयक प्रयोजनासाठी व शासकीय योजनांच्या लाभासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार असून, वेळेची बचत होण्यास आणि कामकाजातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. ही प्रणाली https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्ता निकषात सुधारणा – आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्ता निकषात सुधारणा – आदिती तटकरे मुंबई- अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत

Live Cricket