कराड अर्बन बँकेस उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार
कराड:सहकार क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कराड अर्बन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेला प्रतिष्ठेच्या ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय सहकार परिषदेत बँकेला उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापनासाठीचा ‘Best NPA Management’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेश प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पुरस्कार वितरण समारंभास सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाचे सदस्य मा. सतीश मराठे, मा. विद्याधर अनास्कर, गौतम ठाकुर तसेच NAFCUB व NUCFDC चे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेच्या वतीने अध्यक्ष मा. समीर जोशी, उपाध्यक्ष मा. शशांक पालकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी.ए. धनंजय शिंगटे यांनी उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला.
बँकेने राबविलेली प्रभावी कर्जवसुली मोहीम, विवेकपूर्ण कर्जवितरण धोरण, थकीत कर्जाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, मालमत्ता गुणवत्तेचे व्यवस्थापन आणि एनपीए नियंत्रणासाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न यांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार म्हणजे बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम व संचालक मंडळाचे मार्गदर्शन, तसेच बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांनी नियोजनबध्द केलेल्या वाटचालीमुळे आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली गौरवाची पावती आहे.
या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष मा. समीर जोशी म्हणाले की, “बँकेचे सन्माननीय सभासद, ग्राहक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारीवृंद तसेच हितचिंतक यांनी दाखविलेला विश्वास, सहकार्य आणि पाठिंबा यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. हा पुरस्कार बँकेच्या प्रत्येक घटकाच्या सामूहिक योगदानाचा सन्मान असून भविष्यातही ग्राहकाभिमुख व सक्षम बँकिंग सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. “या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कराड अर्बन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सहकार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर बँकेची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. बँकेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



